Cyber Crime : रेल्वेत सीट मिळवण्याच्या प्रयत्नात महिलेने केले IRCTC ला ट्वीट, खात्यातून चक्क 64 हजार गायब, काय घडले?
Cyber Crime : मुंबईतील एका 34 वर्षीय महिलेने त्यांच्या ट्विटरवर रेल्वे तिकिटांबाबत IRCTC ला टॅग केले. त्यानंतर त्यांच्या खात्यातून सलग 64,000 रुपये कापले गेले.
Cyber Crime : इंटरनेटच्या (Internet) युगात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा (Social Media) वापर झपाट्याने वाढत आहे. एखाद्या नवीन व्यक्तीशी संपर्क साधायचा असो किंवा तुमची तक्रार सरकारपर्यंत पोहोचवायची असो, आज सर्व काही सोशल मीडियाच्या माध्यमातून केले जाते. यासाठी लोक आजकाल विविध प्रकारच्या सोशल मीडिया अॅप्सचा वापर करतात. फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम हे सुरक्षित प्लॅटफॉर्म असल्याचे म्हटले जाते. मात्र, हे अॅप चालवताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. याचाच फटका एका महिलेला बसला आहे.
एक छोटीशी चूक तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते
तुमची महत्त्वाची माहिती कधीही सोशल मीडियावर शेअर करू नका. कारण तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते. इंटरनेट आल्यापासून डिजिटल फसवणुकीच्या घटनांमध्येही सातत्याने वाढ होत आहे. अशीच एक बातमी समोर येत आहे ज्यामध्ये एका महिलेला तिची तक्रार ट्विटरच्या माध्यमातून रेल्वेकडे पाठवायची होती, पण तेव्हाच सायबर गुन्हेगारांनी तिच्या खात्यातून 64,000 रुपये अचानक गायब झाल्याची धक्कादायक बातमी समोर येतेय.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील विलेपार्ले येथे राहणाऱ्या एम एन मीना यांनी 14 जानेवारीला भुजला जाण्यासाठी आयआरसीटीसीच्या (IRCTC) अधिकृत वेबसाइटवरून तीन तिकिटे बुक केली होती. पण ट्रेनमधील सर्व सीट्स बुक झाल्यामुळे त्यांना आरएसी सीट्स मिळाल्या. याचा अर्थ असा की जर कन्फर्म सीट असलेली प्रवासी ट्रेनमध्ये चढला नाही, तर RAC तिकीट असलेल्या प्रवाशाला सीटचा ताबा मिळतो. मात्र असे झाले नाही तर, आरएसी प्रवाशाला सीट शेअर करावी लागते. सीट कन्फर्म झाली आहे की नाही? हा गोंधळ झाल्यामुळे 34 वर्षीय एमएन मीना यांनी त्यांचा तिकीट तपशील आणि त्यांचा मोबाइल नंबर ट्विटरवर पोस्ट केला आणि मदत घेण्यासाठी IRCTC ला टॅग केले.
खात्यातून चक्क 64,000 रुपये उडविले
काही वेळाने त्यांना फोन आला जो त्यांच्या मुलाने उचलला. कॉलरने स्वत:ची ओळख IRCTC चे कस्टमर सपोर्ट ऑफिसर अशी करून दिली आणि तिकीट कन्फर्म करण्यासाठी मोबाईल नंबरवर लिंक पाठवली. यासोबतच त्यांना 2 रुपये भरण्यासही सांगण्यात आले. मीना आणि त्यांचा मुलगा दोघांनाही वाटले की, त्यांनी काही वेळापूर्वी ट्विटरवर पोस्ट केल्यामुळे, IRCTC कदाचित तिला मदत करत असेल. त्यामुळेच त्यांनी जास्त विचार न करता लिंकद्वारे 2 रुपये दिले. यानंतर काही वेळातच त्याला बॅक टू बॅक ट्रान्झॅक्शनचे अनेक अलर्ट मिळाले आणि फसवणूक करणाऱ्याने त्याच्या खात्यातून 64,000 रुपये काढून घेतले.
सोशल मीडियावर माहिती देताना सावधान!
एम.एन.मीना यांनी त्यांचा मोबाईल नंबर सोशल मीडियावर अपलोड केला होता. यातूनच हॅकर्स किंवा फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना फोन करून फिशिंग लिंक पाठवली आणि विश्वासात घेऊन त्यावर पैसे भरण्यास सांगितले. ही एक प्रकारची फिशिंग लिंक होती ज्यावर फसवणूक करणाऱ्याने पैसे पाठवताच त्याच्या बँक खात्याचे तपशील चोरले आणि खात्यातून 64,000 रुपये काढून घेतले. लक्षात ठेवा, कोणतीही संस्था किंवा कंपनी तुम्हाला तुमचे वैयक्तिक तपशील विचारत नाही किंवा व्यवहारांसाठी विनंती करत नाही.
फिशिंग म्हणजे काय?
फिशिंग ही डिजिटल गुन्ह्याची एक पद्धत आहे ज्यामध्ये फसवणूक करणारे विश्वसनीय स्त्रोत असल्याचे भासवून लोकांना ई-मेल, संदेश किंवा लिंक पाठवतात आणि तुम्हाला विश्वासात घेऊन तुमची वैयक्तिक माहिती चोरतात.
इतर बातम्या