Mahakumbh Stampede : संगम तटावर मध्यरात्री सव्वा एक वाजता माणसं पडायला लागली, महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी पाहणाऱ्या मुंबईकर महिलेनं जे घडलं ते सांगितलं..
Mahakumbh Stampede 2025 : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात मध्यरात्री 1 वाजताच्या दरम्यान चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 17जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जातेय.
Mahakumbh Stampede 2025 प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यात मध्यरात्री (29 जानेवारी 2025) ला चेंगराचेंगरी झाली. या घटनेतील मृतांची संख्या 17 पर्यंत पोहोचल्याची माहिती आहे. यासंदर्भात प्राथमिक माहिती समोर आली असून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या संपर्कात असून माहिती घेत असल्याचं म्हटलंय. मध्यरात्री जिथं चेंगराचेंगरी झाली तिथं उपस्थित असणाऱ्या मुंबईतील रहिवासी सरिता कुरतडकर यांनी काय घडलं ते सांगितलं.
मुंबईकर सरिता कुरतडकर म्हणाल्या, शाही स्नानासाठी मुंबईहून प्रयागराजला आले होते. आम्ही सव्वा एकच्या दरम्यान संगम तटावर पोहोचलो तेव्हा तिथं चेंगराचेंगरी झाली. माणसं खाली पडत होती पण ते बघण्यासाठी प्रशासनाचं कोणी उपस्थित नव्हतं.
आम्हाला टीव्हीवर बातम्यात असं सांगितलं गेलेलं की सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेले आहेत,ड्रोन लावलेत, सुविधा दिल्यात पण लोक पडतायत हे त्या कॅमेऱ्यात दिसलं नाही. एक तासाच्या अंतरानं पोलीस आणि फायरब्रिगेडच्या गाड्या दिसल्या. दोन तासानंतर रुग्णवाहिका आली, असं सरिता कुरतडकर यांनी म्हटलं, त्या पुढे म्हणाल्या की तुमची व्यवस्था अशी होती तर लोकांना का बोलावलं, पोलीस तिथं असते तर हे घडलं नसतं.
मृतांची संख्या वाढली?
प्रयागराज येथे संगम घाटावर मौनी अमावस्येनिमित्त मोठ्या संख्येनं भाविक दाखल झाले होते. मध्यरात्री झालेल्या चेंगराचेंगरीत 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र, सरकारकडून अद्याप अधिकृतपणे माहिती देण्यात आली नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाविकांना अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन केलं आहे. तर, याशिवाय योगी आदित्यनाथांनी भाविकांना संगम तटावर स्नानाचा आग्रह सोडून इतर ठिकाणी जी व्यवस्था केलीय, तिथं स्नान करावं, असं आवाहन केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयागराजमधील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर योगी आदित्यनाथ यांना चारवेळा फोन केल्याची माहिती आहे. नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात ट्वीट केलं आहे. प्रयागराजच्या महाकुंभमधील दुर्घटना अत्यंत दु:खद आहे. ज्या भाविकांनी त्यांच्या कुटुंबीयांना गमावलं त्यांच्या प्रति संवेदना आहेत. सर्व जखमींनी लवकर बरं व्हावं, यासाठी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन जखमींच्या मदतीसाठी शक्य ती सर्व मदत केली जात आहे. योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. राज्य सरकारच्या संपर्कात आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
इतर बातम्या :