Divorce : मुलांना भेटायला आलेल्या विभक्त झालेल्या पतीला चहा, नाष्टा देणं गरजेचं नाही, मद्रास न्यायालयाचा निर्णय
Madras High Court : मुलांना भेटायला आलेल्या पतीचे स्वागत 'अतिथी देवो भव' पद्धतीने करावं असा आदेश या आधी न्यायालयाने दिला होता.
चेन्नई: विभक्त झालेला पती त्याच्या मुलांना भेटायला येईल त्यावेळी पत्नीने त्याला चहा, नाष्टा द्यावा याची काही गरज नाही, तसा आदेश अनावश्यक आहे असा निकाल मद्रास न्यायालयाने (Madras High Court) दिला आहे. विभक्त झालेला पती जेव्हा पत्नीकडे त्याच्या मुलांना भेटण्यास येईल तेव्हा त्याचं 'अतिथी देवो भव' अशा पद्धतीने चांगलं स्वागत करावं, चहा नाष्टा विचारावा असं या आधी सिंगल बेंच न्यायाधीशांनी सुचवलं होतं. हा आदेश आता मद्रास उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या बेंचने रद्द केला आहे. सिंगल बेंच जजने हा आदेश जुलै महिन्यात एका सुनावणीदरम्यान दिला होता.
अशा प्रकारचा कोणताही आदेश देणं गरजेचा नाही असं न्यायमूर्ती परेश उपाध्यय आणि न्यायमूर्ती डी भारत चक्रवर्ती यांच्या बेंचने सांगितलं. या आधी जो आदेश देण्यात आला होता तो केवळ विभक्त पती-पत्नीने मुलांच्या भेटीवेळी कशा प्रकारचा व्यवहार करावा या संबंधित होता असंही त्यांनी स्पष्ट केलं.
काय होतं प्रकरण?
एका विभक्त झालेल्या जोडप्याच्या मुलाला त्याच्या वडिलांना भेटण्यासंबंधीच्या याचिकेवर मद्रास उच्च न्यायालयात सिंगल बेंचसमोर सुनावणी सुरू होती. या प्रकरणात त्या मुलाच्या वडिलांना दर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सहा ते आठ या वेळेदरम्यान मुलाला भेटण्याची परवानगी दिली होती. पण त्या मुलाची आई त्या मुलाला घेऊन दिल्लीला घेऊन जाण्याच्या आणि त्याच ठिकाणी कायमचं वास्तव्य करण्याच्या विचारात होती. पण नंतर तसा कोणताही विचार नसल्याचं त्या मुलाच्या आईने न्यायालयाला सांगितलं.
तो मुलगा आईकडे राहत असल्याने त्या मुलाच्या वडिलांना त्याला भेटण्यासाठी शुक्रवारी आणि शनिवारी आईच्या घरी जाऊन भेटण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने या गोष्टीला मान्यता दिली. विभक्त झालेल्या पती किंवा पत्नीसोबत त्यांच्या मुलाच्या भेटीवेळी दुसऱ्या बाजूच्या व्यक्तीने चांगला व्यवहार करावा असा आदेश न्यायालयाने दिला होता.
न्यायालयाने सांगितलं की, पती-पत्नी ज्यावेळी विभक्त होतात त्यावेळी ते एकमेकांशी कट्टर शत्रूप्रमाणे वागणूक करतात. ते कायम एकमेकांशी भांडणाच्या तयारीत असतात. त्यांच्या या भांडणाचा परिणाम त्यांच्या मुलांवर होत असतो. हे भावनात्मक ओझं ते मुल आयुष्यभर घेऊन चालत असतं, त्याच्या जीवनावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो, त्या मुलाचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो.
प्रत्येक मुलाला त्याच्या आई-वडिलांसोबत सुरक्षित आणि प्रेमपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा अधिकार आहे. अशा प्रकारे जोडपे जर विभक्त झाले तर त्याचा परिणाम मुलांच्या आयुष्यावर होतो. हा परिणाम मानसिक तसेच भावनिक असू शकतो असं न्यायालयाने स्पष्ट केलं. पती-पत्नीमध्ये जे काही मतभेद असतील ते त्यांनी त्या दोघांपुरतं मर्यादित ठेवावं, त्याचा परिणाम त्यांच्या मुलावरती होऊ देऊ नये असंही न्यायालयाने स्पष्ट केलं.