Kolkata Rape-Murder Case: 17 ऑगस्ट रोजी दवाखाने राहणार बंद ; 24 तास डॉक्टर जाणार संपावर, IMAची देशव्यापी बंदची हाक
IMA Doctor Strike : 17 ऑगस्ट सकाळी 6 ते 18 ऑगस्ट सकाळी 6 वाजेपर्यंत सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.
मुंबई : कोलकात्यात आरजी कर मेडिकल कॉलेजात महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने(IMA) 17 ऑगस्ट रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. तसेच आयएमएने रुग्णालये सेफ झोन म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे देशातील वैद्यकीय सेवेवर याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे. तसेच आजपासून देशभरातील डॉक्टरांकडून आंदोलन तीव्र करण्याचे संकेत देण्यात आले आहे.
आयएमएने एक पत्रक काढून 17 ऑगस्ट रोजी बंद पुकारण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा 17 ऑगस्ट सकाळी 6 ते 18 ऑगस्ट सकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. तब्बल 24 तास सेवा बंद राहणार आहे. या दरम्यान अत्यावश्यत सेवा सुरू राहणार आहे. आयसीयू, अपघात विभाग आणि प्रसूतीसेवाही सुरू ठेवण्यात येणार असल्याचं आयएमएने स्पष्ट केलं आहे. अत्यावश्यक आरोग्य सेवा, अतिदक्षता कक्ष, सीसीयू, अत्यावश्यक शस्रक्रिया सुरु राहणार आहेत.
24 तासांत खासगी रूग्णालयांमध्ये केवळ आपत्कालीन सेवाच सुरू
शनिवारी सकाळी 6 ते रविवारी सकाळी 6 या 24 तासांत फक्त खासगी रूग्णालयांमध्ये केवळ आपत्कालीन सेवाच सुरू राहणार असल्याची माहिती आयएमएने दिली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन एकजुटीने या संपामध्ये उतरणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा कायदा करण्याच्या मागणीसाठी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदा आणला पाहिजे. जवळपास 25 राज्यांमध्ये डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदे असले, तरी ते त्याची अंमबजावणी होताना दिसत नाही. हॉस्पिटलमध्ये 50 टक्के महिला डॉक्टर असतील तर महिलांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे.
बलात्कार हत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे
कोलकात्यात आरजी कर मेडिकल कॉलेजात महिला डॉक्टरवरील बलात्कार हत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आलाय. हायकोर्टाने हा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश दिले होते. सध्या कोलकाता शहरात तणावाची स्थिती आहे.
पीडित महिला डॉक्टरच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा
बलात्कारानंतर हत्या करण्यात आलेल्या महिला डॉक्टरचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचा दावा केला जातोय. मृत डॉक्टरशी अनेकवेळा बळजबरीने शरीससंबंध ठेवण्यात आल्याचा दावा केला जातोय. पहाटे 3 ते 5 वाजेदरम्यान महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. बलात्कार पीडित महिला डॉक्टरच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा आहेत. या महिलेच्या ओठांवर, नाकावर, गाल, जबडा तसेच शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आहेत. या डॉक्टरच्या डोक्यालाही मार आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार पीडित डॉक्टरचे तोंड बंद करण्यात आले होते.
हे ही वाचा :