(Source: ECI/ABP News/ABP Majha)
kiran Bedi: मी भारत सरकारची आभारी आहे...,नायब राज्यपाल पदावरुन उचलबांगडी केल्यानंतर किरण बेदींची प्रतिक्रिया
Puducherry | नायब राज्यपाल पदावरुन हटवल्यानंतर किरण बेदींनी (kiran Bedi) पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या कार्यकालात आपण त्यागाच्या भावनेनं आणि निष्ठेनं जनहिताची कामं केल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
पुद्दुचेरी: पुद्दुचेरीतील राजकारणानं वेगळं वळण घेतलं असतानाच अचानक किरण बेदींची नायब राज्यपाल पदावरुन उचलबांगडी करण्यात आली. पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल पदाचा अतिरिक्त कारभार तेलंगणाचे राज्यपाल तिमिलिसाई सौंदरराजन यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. आता या विषयावर किरण बेदी पहिल्यांदाच बोलल्या आहेत.
किरण बेदींनी आपल्या सोशल मीडियावरुन एक पत्र शेअर करत आपल्या भावना मांडल्या आहेत. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, "पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल पदाची जबाबदारी दिल्याबद्दल मी भारत सरकारची ऋणी आहे. मी त्या सर्वाचे आभार मानते ज्यांनी या काळात माझ्यासोबत काम केलं."
किरण बेदींनी पुढं लिहलंय की, "मी नायब राज्यपाल म्हणून जे काही केलं ते त्यागाच्या भावनेनं केलं, नैतिक आणि घटनात्मक जबाबदारी पार पाडली. मी पूर्ण विश्वासाने सांगू शकते की या कार्यकाळात मी राज निवास टीमसोबत पूर्ण निष्ठेनं जनहितासाठी काम केलं आहे. पुद्दुचेरीचं भविष्य उज्ज्वल आहे."
Thank all those who were a part my journey as Lt Governor of Puducherry— The People of Puducherry and all the Public officials. 🙏 pic.twitter.com/ckvwJ694qq
— Kiran Bedi (@thekiranbedi) February 17, 2021
Puducherry: पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल पदावरुन किरण बेदींची उचलबांगडी, काँग्रेस सरकार अल्पमतात
नायब राज्यपालपदी कार्यरत असताना किरण बेदींचे पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री नारायणस्वामी यांच्याशी मोठ्या प्रमाणात मतभेद निर्माण झाले होते. नायब राज्यपालांच्या निर्णयामुळे पुद्दुचेरीच्या संबंधित अनेक निर्णय रखडलेले असून त्याचे खापर मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर फोडायला सुरु केलं होतं. त्यामुळे पुद्दुचेरीच्या मुख्यमंत्र्यांना लोकांची सहानुभूती मिळत आहे अशी तक्रार काही भाजप नेत्यांनी केंद्राकडे केल्याची माहिती होती.
काँग्रेसच्या चार आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर पुद्दुचेरीतील नारायणस्वामी सरकार अल्पमतात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी पुद्दुचेरीच्या दौऱ्यावर आहेत. येत्या काही महिन्यात पुद्दुचेरीच्या विधानसभा निवडणूका होणार आहेत.