Khadi and Village Industries Commission : खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने एक नवी उंची, प्रथमच केली 1.15 लाख कोटी रुपयांची उलाढाल
भारतातील सर्व एफएमसीजी कंपन्यांना मागे टाकत खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने प्रथमच 1.15 लाख कोटी रुपयांची उलाढाल केली आहे.
Khadi and Village Industries Commission : खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने एक नवी उंची गाठली आहे. भारतातील सर्व एफएमसीजी कंपन्यांना मागे टाकत खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने प्रथमच 1.15 लाख कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. ही उलाढाल देशातील कोणत्याही एफएमसीजी कंपन्यांच्या उलाढालींपेक्षा लक्षणीय आहे. त्यामुळे खादी आणि ग्रामोद्योग आयोग ही देशातील एकमेव कंपनी आहे जिने 1 लाख कोटी रुपयांची उलाढाल नोंदवली आहे. दरम्यान, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतत दिलेल्या पाठिंब्याबद्दल खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने त्यांचे आभार मानले आहेत.
आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाची एकूण उलाढाल 1 लाख 15 हजार 415.22 कोटी रुपये होती. आधीच्या वर्षी ही उलाढाल (2020-21) 95 हजार 741.74 कोटी रुपये होती. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने उलाढालीत 2020-21 या वर्षापासून 20.54 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. 2014-15 च्या तुलनेत, 2021-22 मध्ये खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रातील एकूण उत्पादनात 172 टक्क्यांची प्रचंड वाढ झाली आहे. तर या कालावधीत एकूण विक्री 248 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे, 2021 मध्ये एप्रिल ते जून या पहिल्या 3 महिन्यांत देशात अंशतः टाळेबंदी असतानाही खादी आणि ग्रामोद्योग आयोगाची ही मोठी उलाढाल आहे.
खादी आणि ग्रामोद्योगाचे आयोगाचे अध्यक्ष, विनयकुमार सक्सेना यांनी खादीच्या उलाढालीत अभूतपूर्व वाढीचे श्रेय हे देशात खादीला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतत दिलेल्या पाठिंब्याला दिले आहे. तसेच नाविन्यपूर्ण योजना, सर्जनशील विपणन नवकल्पना आणि विविध मंत्रालयांचे सक्रिय पाठबळ यामुळे अलीकडच्या वर्षांत खादीच्या प्रगतीत भर पडली आहे. आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी स्वदेशी आणि विशेषत: खादीचा प्रचार करुन पंतप्रधानांनी वारंवार केलेल्या आवाहनामुळे ही आश्चर्यकारक वाढ नोंदवण्यात आली आहे. आज खादी देशातील सर्व एफएमसीजी कंपन्यांपेक्षा आघाडीवर असल्याची माहिती विनयकुमार सक्सेना यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या:
- Maharashtra Din : 'देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचं अभूतपूर्व योगदान'; महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींसह केंद्रातील दिग्गजांचं मत
- PM Modi : पंतप्रधान मोदी 2 मेपासून विदेश दौऱ्यावर, तीन युरोपीय देशांना देणार भेट, 25 कार्यक्रमांमध्ये सहभाग