"न स्विगी, न झोमॅटो, मुलांना घरीच खाऊ घाला आईच्या हातचं हेल्दी जेवण"; हायकोर्टाचा पालकांना मोलाचा सल्ला
Kerala High Court Advice: केरळ उच्च न्यायालयानं म्हटलं आहे की, पालकांनी आपल्या मुलांना त्यांच्या आईनं बनवलेले अन्न खाण्यास प्रोत्साहित करावे. तसेच लहान मुलांसाठी मोबाईल फोनच्या धोक्याबाबत इशारा दिला.
Kerala High Court Advice: केरळ उच्च न्यायालयानं मंगळवारी पोर्नोग्राफीशी संबंधित गुन्ह्याच्या प्रकरणाची सुनावणी करताना, मुलांसाठी घरीच आईनं स्वतःच्या हातानं बनवलेल्या अन्नाचं महत्त्व अधोरेखित केलं आणि पालकांनी आपल्या मुलांना स्विगी आणि झोमॅटोद्वारे रेस्टॉरंटमधून जेवण मागवू देणं टाळण्याचा सल्लाही दिला.
लाईव्ह लॉनं दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान हायकोर्टानं रस्त्याच्या कडेला स्वतःच्या मोबाईलवर अश्लील व्हिडीओ पाहिल्याबद्दल पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीवरील फौजदारी आरोप फेटाळले. न्यायालयानं सर्व आरोप फेटाळताना म्हटलं आहे की, अश्लील व्हिडीओ इतरांसोबत शेअर न करता एकटं पाहणं हा भारतीय दंड संहितेच्या कलम 292 अंतर्गत गुन्हा मानला जाणार नाही.
एकट्यानं अश्लील व्हिडीओ पाहणं गुन्हा नाही : हायकोर्ट
न्यायमूर्ती पीव्ही कुन्हिकृष्णन यांच्या म्हणण्यानुसार, "एखाद्या व्यक्तीनं एकांतात किंवा एकट्यानं अश्लील फोटो, व्हिडीओ पाहणं हा आयपीसीच्या कलम 292 (अश्लीलता) अंतर्गत गुन्हा नाही." त्याचप्रमाणे, एखाद्या व्यक्तीचा मोबाईल फोनवर त्याच्या गोपनीयतेत अश्लील व्हिडीओ पाहणे देखील आयपीसीच्या कलम 292 नुसार गुन्हा नाही. जर आरोपी कोणताही अश्लील व्हिडीओ किंवा फोटो प्रसारित किंवा वितरित करण्याचा किंवा सार्वजनिकरित्या प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो मात्र कलम 292 नुसार गुन्हा आहे.
हायकोर्टानं म्हटलं की, "आरोपीविरुद्ध आयपीसीच्या कलम 292 अन्वये कोणताही गुन्हा दाखल केला जात नाही आणि या प्रकरणाशी संबंधित मॅजिस्ट्रेट कोर्टात सुरू असलेल्या सर्व कार्यवाही रद्द करण्यात येत आहेत."
स्विगी आणि झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करण्याची परवानगी देऊ नका : हायकोर्ट
न्यायमूर्ती पीव्ही कुन्हिकृष्णन यांनी पोर्नोग्राफीशी संबंधित एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान पालकांना सल्ला दिला आहे. न्यायमूर्तींनी सांगितलं की, त्यांनी आपल्या मुलांना स्विगी आणि झोमॅटो यांसारख्या मोबाईल अॅपवरून जेवण मागवण्याऐवजी बाहेर खेळण्यास आणि त्यांच्या आईनं घरीच स्वतःच्या हातानं तयार केलेले, हेल्दी पदार्थ खाण्यास प्रोत्साहित करावं.
मुलांना खेळायला मैदानात पाठवा : हायकोर्ट
उच्च न्यायालयानं म्हटले आहे की, "स्विगी आणि झोमॅटोच्या माध्यमातून रेस्टॉरंटमधून खाद्यपदार्थ ऑर्डर करण्याऐवजी, मुलांना त्यांच्या आईनं तयार केलेले स्वादिष्ट पदार्थ चाखू द्या. पालकांनी मुलांना घरातच न ठेवता त्यांना खेळण्यासाठी खेळाच्या मैदानात पाठवा आणि नंतर त्यांच्या आईनं स्वतःच्या हातानं बनवलेले पदार्थ खाण्यासाठी द्या."
मोबाईल फोनमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांचा इशारा
दरम्यान, न्यायाधीशांनी पालकांना त्यांच्या अल्पवयीन मुलांना योग्य देखरेखीशिवाय मोबाईल फोन देणंही टाळावं, असं हायकोर्टानं सूचित केलं आहे. हायकोर्टानं मोबाईलमुळे होणाऱ्या संभाव्य धोक्यांबाबतही माहिती दिली आहे. तसेच, हायकोर्टानं पालकांना इंटरनेटबाबत इशाराही दिला आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटीसह मोबाइल फोनद्वारे अश्लील व्हिडीओंसह सर्व प्रकारचा कंटेंट सहज उपलब्ध होत असल्याचा उल्लेखही न्यायालयानं केला आहे.