Kerala Blast : मोठी बातमी! केरळ साखळी बॉम्बस्फोटातील सूत्रधाराचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण, कोचीतील व्यक्तीने घेतली स्फोटाची जबाबदारी
Kerala Bomb Blast : केरळमध्ये झालेल्या साखळी स्फोटाची जबाबदारी कोचीतील एका व्यक्तीने स्वीकारली असून त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे.
![Kerala Blast : मोठी बातमी! केरळ साखळी बॉम्बस्फोटातील सूत्रधाराचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण, कोचीतील व्यक्तीने घेतली स्फोटाची जबाबदारी Kerala Convention Centre Blast Kochi Resident Claims Responsibility for Explosion During Christian Prayer Meet in Kalamassery Surrenders Before Police Kerala Blast : मोठी बातमी! केरळ साखळी बॉम्बस्फोटातील सूत्रधाराचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण, कोचीतील व्यक्तीने घेतली स्फोटाची जबाबदारी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/29/b81ae05e9f65a9fc8d8248f6e6c379621698569152243876_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kerala Convention Centre Blast : केरळ (Kerala) मध्ये झालेल्या साखळी स्फोटासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. केरळमध्ये झालेल्या स्फोटाची जबाबदारी कोचीच्या रहिवाशाने स्वीकारली आहे. या व्यक्तीने केरळमधील कलामासरी येथे ख्रिश्चन प्रार्थना सभेदरम्यान झालेल्या सीरियल बॉम्ब ब्लास्टची जबाबदारी स्वीकारली असून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या व्यक्तीने त्रिशूर पोलास स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केलं आहे.
साखळी बॉम्बस्फोटातील आरोपीचं आत्मसमर्पण
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये आला आणि त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. याबाबत अधिक तपशील अद्याप समोर आलेला नाही. आत्मसमर्पण केलेल्या आरोपीने दावा केला आहे की, त्याने बॉम्ब ठेवला होता. पोलिसांकडून सध्या त्या व्यक्तीची चौकशी सुरु आहे. केरळमध्ये रविवारी सकाळी ख्रिश्चन प्रार्थना सभेमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाला. यावेळी सुमारे 2000 लोक उपस्थित होते. या स्फोटात एका महिलेचा मृत्यू झाला असून 35 लोक जखमी झाले. जखमींमधील सात जणांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.
केरळ साखळी स्फोटानं हादरलं
दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी प्रकरणी उच्चस्तरीय बैठक बोलावली. या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी तिरुवनंतपुरममध्ये सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. केरळच्या कलामासेरी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये रविवारी अनेक बॉम्बस्फोट झाले. या तपासात असे दिसून आले आहे की, स्फोट घडवण्यासाठी टिफिन बॉक्समध्ये ठेवलेले इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस (IED) वापरण्यात आले होते. ज्याद्वारे हे सीरियल स्फोट घडवण्यात आले.
दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने बॉम्ब स्फोट
केरळमधील साखळी बॉम्ब स्फोट दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याची पुष्टी सूत्रांनी केली आहे. स्फोटाच्या वेळी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सुमारे 2000 लोक प्रार्थनेसाठी जमले होते. कोची येथील राष्ट्रीय गुप्तचर संस्थेचे (NIA) चार सदस्यीय पथक घटनास्थळी तपासासाठी दाखल झाले आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. तसेच, या प्रकरणातील सर्व पैलूंची सखोल चौकशी केली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
पोलीस आणि NIA कडून पुढील तपास सुरु
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आली होती त्या ठिकाणाहून अनेक स्फोट झाल्याची माहिती मिळाली. सकाळी 9 च्या सुमारास हे स्फोट झाले होते आणि हॉल सील करण्यात आला होता आणि केरळ पोलिसांचे दहशतवाद विरोधी पथक घटनास्थळी होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Mumbai Alert : केरळमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट! पोलिसांसह गुप्तचर यंत्रणा सतर्क
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)