![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरण : तिघांना जन्मठेप, इतर तीन आरोपींना पाच वर्षाची शिक्षा
जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये 8 वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी आठ पैकी सहा आरोपांना दोषी ठरवण्यात आलं आहे.
![कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरण : तिघांना जन्मठेप, इतर तीन आरोपींना पाच वर्षाची शिक्षा Kathua rape and murder case, Six accused found guilty by Pathankot Court one acquitted कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरण : तिघांना जन्मठेप, इतर तीन आरोपींना पाच वर्षाची शिक्षा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/06/10125606/Rape.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पठाणकोट/जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीरच्या कठुआमध्ये आठ वर्षाच्या मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणी आठपैकी सहा आरोपींना दोषी ठरवण्यात आलं आहे. दोषींपैकी तीन आरोपींना जन्मठेपेची तर तीन आरोपींना पाच वर्ष कारावासाची शिक्षा पंजाबमधील पठाणकोट न्यायालयाने सुनावली आहे.
सांझीराम, दीपक खजूरिया, प्रवेश कुमार या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर सुरेंद्र कुमार, आनंद दत्ता, तिलकराज या तिघांना पाच वर्ष कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. एक आरोपी अल्पवयीन असून त्याच्याविरुद्धचा खटला अद्याप सुरु झालेला नाही. वयासंबंधीच्या याचिकेवर जम्मू काश्मीर उच्च न्यायालय सुनावणी करणार आहे.
संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या या प्रकरणाची सुनावणी बंद खोलीत 3 जून रोजी पूर्ण झाली होती. त्यावेळी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तेजविंदर सिंह यांनी 10 जून रोजी निकाल देण्याची घोषणा केली होती.
10 जानेवारीला मुलीचं अपहरण
मागील वर्षी 10 जानेवारी 2018 रोजी खेचर चरण्यासाठी आठ वर्षीय मुलगी कठुआजवळच्या जंगलात गेली होती. तिथून तिचं एका अल्पवयीन आरोपीने अपहरण केलं आणि जवळच्या मंदिराच्या तळघरात लपवलं. यानंतर नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने अमानुष अत्याचार केले. चार दिवस तिला बेशुद्धअवस्थेत ठेवून नंतर तिची हत्या केली. या प्रकरणी सरपंचासह आठ जणांवर आरोप निश्चित झाले होते.
17 जानेवारीला मृतदेह सापडला या प्रकरणात 15 पानांचं आरोपपत्र दाखल झालं होतं. आरोपपत्रानुसार, 10 जानेवारीला मुलीचं अपहरण झालं होतं. 14 जानेवारीला तिची हत्या करण्यात आली आणि 17 जानेवारीला तिचा मृतदेह सापडला होता. नशेच्या अवस्थेत तिला मंदिराच्या तळघरात ठेवलं आणि आळीपाळी तिच्यावर बलात्कार केला. मग तिची हत्या करण्यात आली. जम्मूमधील हिंदूबहुल भागातून मुस्लीम लोकसंख्या कमी करण्यात ही हत्या करण्यात आली होती, ही बाबही आरोपपत्रातून समोर आली आहे.
7 आरोपींविरोधात आरोप निश्चित जून 2018 रोजी 7 आरोपींविरोधात आरोप निश्चित झाले होते. क्राईम ब्रान्चने मंदिराचे संरक्षक आणि मुख्य आरोपी सांझी राम, त्याचा मुलगा विशाल, विशेष पोलिस अधिकारी दीपक खजुरिया उर्फ दीपू, सुरिंदर वर्मा, परवेश कुमार उर्फ मन्नू, हेड कॉन्स्टेबल तिलक राज आणि उपनिरीक्षक अरविंद दत्त या सात जणांना अटक केली होती. आठवा आरोपी सांझी रामचा पुतण्या होता, त्यालाही अटक करण्यात आली. त्याची सुनावणी अद्याप सुरु झालेली नाही, कारण 18 वर्ष वयाचा असल्याच्या दाव्यावर प्रतिवाद सुरु आहे.
आरोपपत्र दाखल करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न आरोपपत्र समोर आल्यानंतर जिल्ह्यातील तणाव आणखी वाढला. काही वकिलांनी आरोपपत्रावर प्रश्न उपस्थित करत सीबीआय तपासाची मागणी केली होती. एवढंच नाही तर आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोहोचलेल्या क्राईम ब्रान्चच्या टीमला वकिलांच्या समूहाने रोखण्याचा प्रयत्न केला होता.
भाजपचे दोन मंत्री निलंबित हे प्रकरण अतिशय तापलं. पीडीपी-भाजपच्या तत्कालीन सरकारसाठी हा वादाचा विषय बनला. क्राईम ब्रान्चने अटक केलेल्या आरोपींच्या समर्थनार्थ हिंदू एकदा मंचने आयोजित केलेल्या रॅलीमध्ये सहभागी झाल्याप्रकरणी भाजपला चौधरी लाल सिंह आणि चंदर प्रकाश गंगा या दोन मंत्र्यांना निलंबित करावं लागलं होतं.
खटला पठाणकोटला ट्रान्सफर, दररोज सुनावणी सुप्रीम कोर्टाने मे 2018 रोजी हा खटला पठाणकोटला ट्रान्सफर केला. कठुआमध्ये या खटल्याची निष्पक्ष सुनावणी होऊ शकणार नाही, त्यामुळे स्थलांतरीत करावा, अशी मागणी जम्मू काश्मीर सरकार आणि काही वकिलांनी केली होती. सुप्रीम कोर्टाने पठाणकोटच्या जिला आणि सत्र न्यायाधीशांना कोणत्याही स्थगितीशिवाय बंद खोलीत या खटल्याची सुनावणी करण्याचे निर्देश दिले होते.
सर्वात कमी वयात न्यायाधीश बनणाऱ्या तेजविंदर सिंह यांच्या कोर्टात सुनावणी जून 2018 च्या पहिल्या आठवड्यात पंजाबच्या पठाणकोटच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात दररोज कॅमेऱ्याच्या निगराणीत खटल्याची सुरुवात झाली. सत्र न्यायाधीश तेजविंदर सिंह यांनी या खटल्याची सुनावणी केली. लिम्पा बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांच्या नावाची नोंद आहे. कमी वयात सत्र न्यायाधीश बनण्याचा विक्रम त्यांच्या नवावर आहे.
या कलमांंतर्गत आरोपींवर आरोप कोर्टाने आरोपींविरोधात कलम 120 बी (गुन्हेगारी षडयंत्र, 302 (हत्या) आणि 376 ड (सामूहिक बलात्कार) अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आला आहे. जर ते यात दोषी सिद्ध झाले, तर आरोपींना कमीत कमी आजीवन जन्मठेप आणि जास्तीत जास्त फाशीची शिक्षा सुनावली जाऊ शकते.
आरोपींची रवानगी गुरदासपूर जेलमध्ये सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर अल्पवयीन आरोपी वगळता सर्व आरोपींची रवानगी गुरदासपूर जेलमध्ये करण्यात आली होती. सोबत बचाव पक्षाच्या वकिलांची संख्याही मर्यादित करण्यात आली होती.
साक्षीदाराला कारणे दाखवा नोटीस नोव्हेंबर 2018 मध्ये पठाणकोट न्यायालयाचे न्यायाधीश तेजविंदर सिंह यांनी साक्षीदार अजय कुमार उर्फ अज्जू यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. त्याच्यावर खोटा जबाब दिल्याचा आरोप होता. न्यायाधीशांसमोर जबाब दिल्यानंतर त्याने तो फिरवल्याचा आरोप अजय कुमारवर होता.
3 जून रोजी युक्तिवाद पूर्ण, सुरक्षा कडेकोट या महिन्यात 3 जून रोजी या प्रकरणाचा युक्तिवाद पूर्ण झाला. 10 जून रोजी निकाल सुनावण्यात येईल, असं न्यायाधीश तेजविंदर सिंह यांनी सांगितलं. निकालाच्या पार्श्वभूमीवर कोर्ट आणि कठुआमध्ये सुरक्षा वाढवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)