'शिवाजी महाराज मूळचे कर्नाटकातील', कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद कार्जोळ बरळले!
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री गोविंद कार्जोळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज मूळचे कर्नाटकातले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे मूळचे कन्नड भूमीतील आहे, असं वक्तव्य केलं आहे.
बेळगाव: कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री गोविंद कार्जोळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज मूळचे कर्नाटकातले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे मूळचे कन्नड भूमीतील आहे, असं वक्तव्य केलं आहे. बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रात संमिश्र सरकार आहे. काँग्रेस केव्हा आपल्याला खुर्चीवरून उतरवेल याची भीती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहे. त्या कारणासाठी आणि लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत, असं देखील कार्जोळ म्हणाले.
ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी इतिहास वाचलेला नाही. त्यामुळे त्यांना इतिहास माहीत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज हे कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील सोरटूर गावचे. त्यांचे मूळ पुरुष बेळीअप्पा आहेत. कर्नाटकात दुष्काळ पडला म्हणून ते महाराष्ट्रात गेले. नंतरच्या पिढीतील शिवाजी महाराज आहेत. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज हे मूळचे कन्नड भूमीतील आहेत, असं गोविंद कार्जोळ म्हणाले. ते म्हणाले की, कर्नाटकात मराठी, कन्नड जनता प्रेमाने राहते. जात मराठा असली तरी ते कन्नडच आहेत. महाराष्ट्रात देखील कन्नड मराठी जनता प्रेमाने राहते. उध्दव ठाकरे यांनी खुर्चीसाठी वातावरण बिघडवायचे काम करू नये असे गोविंद कार्जोळ म्हणाले.
गुलबर्ग्यात महाराष्ट्राच्या बसला काळी शाई लावली कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकातील गुलबर्गा इथे महाराष्ट्राच्या बसला काल काळी शाई लावली. लाल पिवळा कन्नड ध्वज हातात घेतलेल्या कार्यकर्त्यांनी गुलबर्गा-सोलापूर बस थांबवून घोषणाबाजी केली आणि काचेवर काळी शाई लावली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमाभाग महाराष्ट्रात घेणारच असे जाहीर केल्यानंतर कन्नड संघटना अस्वस्थ झाल्या आहेत. त्यातच पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव, निपाणी, कारवार संयुक्त महाराष्ट्र होणारच असे पोस्टर कर्नाटकच्या बसवर लावले होते. त्याचे पडसाद कर्नाटकात उमटले आहेत. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी लाल पिवळा कन्नड ध्वज हातात घेऊन आंदोलन छेडले. गुलबर्गा इथे गुलबर्गा-सोलापूर ही महाराष्ट्राची बस थांबवून कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. केवळ घोषणाबाजीवर ते थांबले नाही तर त्यांनी चक्क काचांवर काळी शाई लावली.
कर्नाटकमधील भाजप नेत्यांची वक्तव्य चुकीची, आम्ही निषेध करतो : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
कर्नाटकची एक इंचही जमीन महाराष्ट्राला दिली जाणार नाही- मुख्यमंत्री येडियुरप्पा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 16 जानेवारी रोजी कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन केल्यानंतर कर्नाटक व्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला होता. कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत," असं मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी उत्तर दिलं होतं. "कर्नाटकची एक इंचही जमीन महाराष्ट्राला दिली जाणार नाही. उद्धव ठाकरे केवळ राजकारणासाठी अशी वक्तव्ये करत आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे मला दु:ख झालं. यामुळे सध्याचं सौहार्दाचं वातावरण बिघडू शकतं," असं येडियुरप्पा म्हणाले होते.
मुख्यमंत्री काय म्हणाले होते? 'महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प' या शासकीय पुस्तकाचं बुधवारी (28 जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन झालं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकव्याप्त वादग्रस्त भाग केंद्रशासित झाला पाहिजे असं म्हणाले. "एक दिलाने लढलो तर प्रश्न सुटेल. पवारसाहेबांनी यावर काम केलं आहे. हा प्रश्न कोर्टात असेपर्यंत हा भाग केंद्रशासित का करत नाही? कर्नाटक बेलगाम वागत आहे. हा भाग केंद्रशासित झाला पाहिजे, यात कर्नाटक सरकारची मस्ती चालू देणार नाही, असं आपण कोर्टात सांगितलं पाहिजे," असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचं उद्धव ठाकरेंना उत्तर उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, "कर्नाटकातील मराठी भाषिकांना मुंबई कर्नाटकात सामील करण्याची इच्छा आहे. या भागातील लोकांसह, माझी देखील मागणी आहे की, मुंबई कर्नाटकात सामील करावी. जोपर्यंत असे होत नाही तोपर्यंत, मी केंद्र सरकारला विनंती करतो की मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावं."
संबंधित बातम्या
- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत, हे कर्नाटक सरकारने विसरु नये : संजय राऊत
- Maharashtra-Karnataka Border Dispute | कर्नाटकव्याप्त वादग्रस्त भाग केंद्रशासित प्रदेश घोषित करा : मुख्यमंत्री
- मुंबई कर्नाटकात सामील व्हावी ही मराठी भाषिकांची इच्छा; कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्याचं उद्धव ठाकरे यांना उत्तर
- कर्नाटकव्याप्त वादग्रस्त भाग केंद्रशासित होऊ शकतो का? घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणतात..
- कर्नाटकची एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, सीमा वादावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं उद्धव ठाकरेंना उत्तर
- कर्नाटकमधील भाजप नेत्यांची वक्तव्य चुकीची, आम्ही निषेध करतो : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील