Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राच्या 'त्या' एका डिनरनं सगळं काही बदललं; पोलीस तपासात खळबळजनक माहिती समोर
Jyoti Malhotra : हिसार पोलिसांच्या IT सेल आणि सायबर शाखेच्या टीम्स ज्योती मल्होत्रा हिच्या लॅपटॉप आणि मोबाइल फोनची सखोल तपासणी करत आहेत.

Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक झालेली हिसारच्या न्यू अग्रसेन कॉलनीत राहणारी युट्यूबर ज्योती मल्होत्रा (Jyoti Malhotra Youtuber) ही सामान्य घरातील मुलगी आहे. आलिशान आणि लक्झरी आयुष्य जगण्याच्या हव्यासामुळे ती देशविरोधी कारवायांमध्ये सामील झाल्याचे सांगितले जात आहे. वडिलांसोबत एका छोट्या घरात राहणाऱ्या ज्योतीला पैसे कमावण्याची इतकी घाई होती की उच्च माध्यमिक शिक्षण झाल्यावर तिने त्वरित नोकरी शोधण्यास सुरुवात केली होती. सुमारे 14 वर्षांपूर्वी तिने एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून पहिली नोकरी स्वीकारली होती.
रिसेप्शनिस्टची नोकरी सोडल्यानंतर ज्योती मल्होत्रा हिसारपासून 20 किलोमीटर दूर असलेल्या एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करू लागली. मात्र, तिने तिथेही फार काळ काम केले नाही आणि नंतर हिसारमधील एका कॉलेजजवळ असलेल्या मार्केटमध्ये एका खाजगी कार्यालयात पुन्हा रिसेप्शनिस्ट म्हणून काम सुरू केले. सतत नवीन नोकऱ्या शोधणे आणि जुन्या सोडणे यातच तिचं आयुष्य पुढे सरकत गेलं. पण तिला तिच्या स्वप्नांप्रमाणे जीवन जगता येत नव्हतं.
शेवटची नोकरी सोडल्यानंतर व्हिडिओ बनवायला सुरुवात
कोरोना काळात गुरुग्राममधून शेवटची नोकरी सोडून ज्योती मल्होत्रा हिसारला परतली आणि तिथूनच तिने सोशल मीडियावर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. यूट्यूब व्हिडिओ आणि ट्रॅव्हल ब्लॉगिंगमधून पैसे येऊ लागल्यावर तिने हाच मार्ग पुढे चालण्याचा निर्णय घेतला. इथूनच तिच्या आयुष्यात वळण आलं. मोठ्या गाड्यांमध्ये फिरण्याची, उच्चभ्रू लोकांसोबत उठबस करण्याची, चंगळखोरी करण्याची आणि बँक खात्यात मोठी रक्कम असावी ही इच्छा तिला देशविरोधी कारवायांच्या मार्गावर घेऊन गेली. हिसारमधील एफसी वुमन कॉलेजमधून तिने बीए पूर्ण केलं. ज्योती ही तिच्या आई-वडिलांची एकमेव मुलगी आहे.
'ट्रॅव्हल विथ जो' चॅनलवर लाखो फॉलोअर्स
ज्योती मल्होत्राच्या 'ट्रॅव्हल विथ जो' या चॅनलवर 3.77 लाख यूट्यूब फॉलोअर्स आणि 1.31 लाख इंस्टाग्राम फॉलोअर्स आहेत. ती देश-विदेशातील विविध ठिकाणांच्या प्रवासाशी संबंधित माहिती आणि प्रसिद्ध स्थळांचे व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील चांगले व्ह्यूज मिळतात. ज्योतीने 22 ऑक्टोबर 2018 रोजी आपला पासपोर्ट बनवला होता. त्यानंतर ती काही काळ नोकरी करत राहिली. सुमारे तीन वर्षांपूर्वी तिने 'ट्रॅव्हल विथ जो' नावाने यूट्यूब चॅनल सुरू केला आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात केली.
पाकिस्तान दूतावासातील कर्मचाऱ्याशी झाला संपर्क
यानंतर दिल्लीतील पाकिस्तान दूतावासातील कर्मचारी एहसान-उर-रहीम ऊर्फ दानिश याच्या संपर्कात ज्योती आली आणि हळूहळू ती गुप्तहेरगिरीच्या जाळ्यात अडकली. तिने दानिशचा मोबाईल नंबर घेतला आणि त्यांच्यात संवाद सुरू झाला. त्यानंतर ज्योतीने दोन वेळा पाकिस्तानचा प्रवास केला होता. इंटेलिजन्स ब्युरोच्या माहितीनुसार, ज्योती दोन वेळा दिल्लीहून शीख जत्थ्यासोबत आणि एकदा एकटीच करतारपूर साहिब गुरुद्वाऱ्याच्या दर्शनासाठी पाकिस्तानात गेली होती. ती दुबई, थायलंड, इंडोनेशिया, नेपाळ, भूतान, चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशचा सुद्धा प्रवास करून आली आहे.
दानिशने ज्योतीला बोलावले होते डिनरसाठी
पाकिस्तान दूतावासातील कर्मचारी एहसान उर रहीम उर्फ दानिशने ज्योतीला डिनरसाठी आमंत्रित केले होते. या भेटीदरम्यान दोघांमध्ये संवाद झाला आणि ज्योतीने एक व्हिडीओही रेकॉर्ड केला. नंतर दानिश आणि त्याचा साथीदार अली एहसान यांनी ज्योतीची ओळख पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांशी करून दिली. ज्योती मल्होत्रा पाकिस्तान दूतावासातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती आणि त्यांच्या कार्यक्रमांनाही हजेरी लावत होती. तिचा पाकिस्तान दौरा देखील स्पॉन्सर केलेला होता. हिसार पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार, ज्योतीशी संबंधित अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स देखील सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहेत आणि लवकरच त्यांची चौकशी केली जाणार आहे.
ज्योती मल्होत्राला पाच दिवसांची पोलीस कोठडी
दरम्यान, ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे. सध्या तिची चौकशी सुरू असून तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हिसार पोलिसांची आयटी सेल आणि सायबर शाखा मिळून तिच्या लॅपटॉप, मोबाईल फोन आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी करत आहेत. त्याचबरोबर तिचे बँक खाते आणि विदेश प्रवास, विशेषतः पाकिस्तान, चीन आणि काश्मीर दौऱ्याची सखोल चौकशी केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
डिजिटल कंटेंटची सखोल तपासणी
चौकशीदरम्यान समोर आले आहे की, ज्योती पाकिस्तानमधील काही उच्चभ्रू व्यक्तींशी संपर्कात होती. या भेटीमागील कारण नेमकं काय होतं? याचा सध्या तपास केला जात आहे. तसेच, तिने भारतातील कोणतीही संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिली आहे का? हेही तपासले जात आहे. ज्योतीला कोण-कोण लोक मदत करत होते? तिचे सर्व व्हिडीओ आणि डिजिटल कंटेंटची सखोल तपासणी केली जात असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे.
दानिशशी संबंध आणि खर्चाची फंडिंग याबाबतही चौकशी
हिसार पोलिसांच्या माहितीनुसार, सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तान दूतावासातील पारितोषिक सोहळ्यात सहभागी होणे, पाकिस्तानी अधिकृत दानिशशी संबंध आणि खर्चांची फंडिंग याबाबत चौकशी केली, मात्र या प्रश्नांना ज्योतीने कोणतेही उत्तर दिले नाही. तपास यंत्रणांनी ज्योतीला विचारले की, पाकिस्तानमध्ये थांबण्याचा आणि फिरण्याचा खर्च कोण करत होतं? यावर पाकिस्तान दूतावासातर्फे सोशल मीडिया इन्फ्लुएंसरना प्रवासासाठी बोलावले जात होते, असे तिने म्हटले आहे.
आणखी वाचा
Jyoti Malhotra : पाकिस्तानच्या ISI चे हेरगिरी मॉड्यूल भारतात कसे काम करते? हनी ट्रॅपचा पॅटर्न काय?























