(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CJI Sanjiv Khanna : देशाच्या 51 व्या सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची नियुक्ती, राष्ट्रपतीभवनात घेतली शपथ!
न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या खटल्यांत आपला निर्णय दिलेला आहे. ते देशाचे 51 वे सरन्यायाधीश ठरले आहेत.
CJI Sanjiv Khanna Oath : न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी देशाचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. आज (11 नोव्हेंबर) राष्ट्रपतीभवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संजीव खन्ना यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. याआधी त्यांनी ऐतिसहासिक ठरणाऱ्या अनेक खटल्यांचा निकाल दिलेला आहे. कलम 370 रद्द करणे, इलेक्टोरल बॉण्ड रद्द करणे अशा अनेक महत्त्वाचे निर्णय देणाऱ्या खंडपीठातचे सदस्य होते.
सहा महिने सरन्यायाधीश म्हणून काम पाहणार
नवे सरन्यायधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ 13 मे 2025 पर्यंत म्हणजेच साधारण सहा महिने असणार हे. संजीव खन्ना यांनी दिल्लीच्या मॉडर्न स्कुल आणि सेंट स्टिफन्स कॉलेजमधून शिक्षण घेतलेलं आहे. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी घेतलेली आहे. त्यांनी 1983 साली तीस हजारी कोर्टात वकिलीला सुरुवात केली होती. 2005 साली ते दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. जानेवारी 2019 मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून बढती मिळाली.
वडील दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचे वडीलदेखील दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. त्यांचे काकादेखील देशातील सर्वाधिक प्रतिष्ठीत असलेल्या वकिलांपैकी एक होते.
अनेक मोठ्या खटल्यांचा दिला निर्णय
नवनियुक्त सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय दिलेले आहेत. त्यांनीच दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी जामीन मंजूर केला होता. मनीष सिसोदिया यांनादेखील त्यांच्या आदेशानुसार जामीन देण्यात आला होता. लोकसभा निवडणुकीदरम्यान 26 एप्रिल रोजी त्यांनी VVPAT आणि EVM यांच्यातील मतांची 100 टक्के जुळवाजुळव करण्याची मागणी फेटाळून लावली. नवनियुक्त सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनीच इलेक्टोरल बाँण्ड असंवैधानिक असल्याचा निर्णय दिला होता. त्यांनीच मुख्य न्यायाधीश कार्यालयाला माहिती अधिकारात आणण्याचा निर्णय दिला होता.
धनंजय चंद्रचूड निवृत्त
दरम्यान, देशाचे 50 वे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड 10 नोव्हेंबर रोजी निवृत्त झाले. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वाच्या खटल्यांत ऐतिहासिक निर्णय दिले. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष तसेच शिवसेना, राष्ट्रवादी पक्षातील लढ्याची सुनावणी त्यांच्यापुढेच होत होती. मात्र आता ते निवृत्त झाल्यानंतर नव्या सरन्यायाधीशांपुढे या प्रकरणांची सुनावणी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
Sanjeev Khanna : न्या. संजीव खन्ना होणार भारताचे नवे सरन्यायाधीश, CJI धनंजय चंद्रचूड यांनी केंद्राला नाव पाठवलं