Agneepath : सैन्य भरतीमध्ये होणार मोठा बदल; 'अग्नीपथ' योजनेच्या माध्यमातून होणार 'अग्नीवीरां'ची भरती
Indian Army : 'अग्नीपथ भरती प्रवेश योजने'च्या माध्यमातून लष्करात भरती होणाऱ्या युवकांना ‘अग्नी वीर’ असं म्हटलं जाईल. ही सेवा तीन वर्षांची असणार आहे.
नवी दिल्ली: भारतीय लष्करात भरती व्हायचं असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. लष्करात भरती होण्यासाठी युवकांना आता नवीन मार्ग उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारने आराखडा तयार केला आहे. ‘अग्नीपथ भरती प्रवेश योजना’ असं या योजनेचं नाव असून या माध्यमातून तरुणांना तीन वर्षांसाठी लष्करात भरती होता येणार आहे. हा आराखडा अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात असल्याचं सांगण्यात येतंय.
'अग्नीपथ भरती प्रवेश योजने'च्या माध्यमातून लष्करात भरती होणाऱ्या युवकांना ‘अग्नी वीर’ असं म्हटलं जाईल. ही सेवा तीन वर्षांची असणार आहे. त्यानंतर जर या युवकांना लष्करात कायम रहायचं असेल तर त्यांच्या आधीच्या कामावरुन त्यांची निवड लष्कराकडून करण्यात येईल अशी माहिती आहे.
कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात लष्करातील भरती करण्यात आली नव्हती. आता अग्नीवीरांच्या माध्यमातून लष्कराकडून ही भरती करण्यात येणार असल्याची माहिती आहे. भरती झालेल्या या युवकांना वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जावं लागेल. या दरम्यान त्यांना दंगल विरोधी अभियान, बंडखोरी विरोधी अभियान, गुप्त माहिती गोळा करणे, आणि आयटी संबंधित प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
अग्नीपथ योजनेवर संरक्षण मंत्रालयात या आठवड्यात महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये या योजनेवर विस्तृत चर्चा करण्यात आली. लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी 2020 सालीच हा प्रस्ताव मांडला होता. आता नेमक्या कोणत्या स्वरुपात ही योजना आणण्यात येईल याची माहिती लवकरच समोर येणार आहे.
कोरोना काळात भरती न झाल्याने सध्या भारतीय लष्करात सव्वा लाखाहून जास्त पदे रिक्त असल्याची माहिती आहे. तीनही दलांचा विचार करता तब्बल 1,25,364 जागा या भरायच्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
- Viral Video : बर्फाच्छादित डोंगरावर रंगला कबड्डीचा खेळ; ITBP जवानांचा व्हिडीओ व्हायरल
- Kashmir Helicopter Crash: जम्मू काश्मीरमध्ये सैन्याचे हेलिकॉप्टर क्रॅश, पायलटसह दोन जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
- Defence Ministry Update: भारताच्या मिसाईलचा निशाणा थेट पाकिस्तानमध्ये; मिसाईल चुकून डागल्याचं सांगत भारताकडून खेद व्यक्त