Jessica Lall : जेसिका लालच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळवून देणाऱ्या सबरीना लाल यांचे निधन
सबरिना लाल या जेसिका लाल यांच्या बहिण असून त्यांचे दीर्घ आजाराने निधन झालं. देशभर गाजलेल्या जेसिका लाल हत्याकांडातील आरोपींना शिक्षा मिळावी म्हणून सबरीना लाल यांनी मोठी कायदेशीर लढाई लढली होती.
नवी दिल्ली : देशभर गाजलेल्या जेसिका लाल हत्याकांडातील आरोपींना शिक्षा मिळवून देण्यासाठी मोठी कायदेशीर लढाई लढणाऱ्या सबरीना लाल यांचे रविवारी संध्याकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. सबरीना लाल (वय 53) या जेसिका लाल यांच्या बहिण होत्या. लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि अशा महिलांना मदत करण्यासाठी आपण एक संस्था सुरु करणार असल्याचं सबरीना लाल यांनी गेल्या वर्षी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
सबरीना लाल या दीर्घ काळापासून आजारी होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होता. रविवारी त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. पण रविवारी संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला अशी माहिती त्यांचे बंधू रणजित लाल यांनी पीटीआयला दिली.
जेसिकाला विसरु शकत नाही
देशभर गाजलेल्या जेसिका लाल हत्याकांडाचा त्यांच्या कुटुंबियांवर मोठा परिणाम झाला होता. आपल्याला जेसिकाची खूप आठवण येते, आपण तिला मिस करतो असं सबरीना लाल यांनी अनेक मुलाखतीत सांगितलंय. जेसिका लाल हत्याकांडमधील मुख्य आरोपीला गेल्या वर्षी तुरुंगातून सोडण्यात आल्यानंतर त्याला विरोध न करता 'आपण त्याला माफ करत आहोत' असं वक्तव्य सबरीना लाल यांनी केलं होतं.
जेसिका लाल हत्याकांड
जेसिका लाल हत्याकांड हे देशभर गाजलेलं प्रकरण होतं. दिल्लीमध्ये 30 एप्रिल 1999 रोजी पहाटे दोन वाजता एका मोठ्या हॉटेलमध्ये जेसिका लालची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिद्धार्थ वशिष्ट म्हणजे मनू शर्मा हा हरयाणातील एका खासदाराचा पुत्र होता.
जेसिका लाल हत्याकांडाच्या प्रकरणी म्हणजे डिसेंबर 2006 रोजी मनू शर्माला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आणि त्याची रवाणगी तिहारमध्ये करण्यात आली. पण 2020 मध्ये, दिल्लीच्या नायब राज्यपालांनी तुरुंगातील चांगल्या वर्तनाबद्दल मनू शर्माची शिक्षा कमी केली आणि त्याला मुक्त केलं.
महत्वाच्या बातम्या :