Kathua: कठुआ अत्याचार आणि खून प्रकरणी अल्पवयीन आरोपीला प्रौढ समजून खटला चालवणार; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
जम्मू काश्मीरमध्ये जानेवारी 2018 मध्ये आठ वर्षाच्या आदिवासी मुलीवर आठ नराधमांनी अत्याचार करत तिची हत्या केली होती. या प्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा आदेश दिला आहे.
नवी दिल्ली: जम्मू काश्मीरमधील कठुआतील आठ वर्षाच्या आदिवासी मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी (Kathua Rape and Murder Case) सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा आदेश जाही केला आहे. या प्रकरणातील त्या वेळी अल्पवयीन असलेल्या आरोपीला प्रौढ समजून त्याच्यावर खटला सुरू करण्यात येणार आहे. शुभम सांग्रा असं या आरोपीचं नाव आहे.
सर्वोच्च न्यायालयातील या सुनावणीच्या दरम्यान न्यायमूर्ती जेबी पारदीवाला आणि न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांच्या घटनापीठानं म्हटलं आहे की, या मुद्द्यावर कोणत्याही वैधानिक पुराव्याअभावी आरोपीच्या वयाबद्दलचे मेडिकल ओपिनियनकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही. या प्रकरणात इतर कोणतीही ठोस साक्ष नसताना आरोपीचे वय निश्चित करण्यासाठी मेडिकल ओपिनियनचा विचार करायला हवा. आरोपीला गुन्हा करताना अल्पवयीन मानलं जाऊ शकत नाही, तर त्याला प्रौढ समजलं जाईल आणि त्याच्यावर खटला चालवण्यात येईल.
काय आहे प्रकरण?
देशाला हादरवून सोडणाऱ्या कठुआ बलात्कार प्रकरणात एका आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. 10 जानेवारी 2018 रोजी खेचर चरण्यासाठी आठ वर्षीय मुलगी जम्मू काश्मीरमधील कठुआजवळच्या जंगलात गेली होती. तिथून तिचं एका अल्पवयीन आरोपीने अपहरण केलं आणि जवळच्या मंदिराच्या तळघरात लपवलं. यानंतर नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने अमानुष बलात्कार केला. चार दिवस तिला बेशुद्धअवस्थेत ठेवून नंतर तिची हत्या केली. या प्रकरणी सरपंचासह आठ जणांवर आरोप निश्चित झाले होते.
तिघांना जन्मठेप, इतर तीन आरोपींना पाच वर्षाची शिक्षा
आठ वर्षाच्या मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणी आठपैकी सहा आरोपींना दोषी ठरवण्यात आलं. जून 2019 मध्ये दोषींपैकी तीन आरोपींना जन्मठेपेची तर तीन आरोपींना पाच वर्ष कारावासाची शिक्षा पंजाबमधील पठाणकोट न्यायालयाने सुनावली.
सांझीराम, दीपक खजूरिया, प्रवेश कुमार या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तर सुरेंद्र कुमार, आनंद दत्ता, तिलकराज या तिघांना पाच वर्ष कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. या प्रकरणात एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
या प्रकरणातील शुभम सांग्रा हा आरोपी अल्पवयीन असल्याचं सांगितलं जात होतं. आता त्याला प्रौढ समजून त्याच्यावर खटला चालवण्यात यावा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
दरम्यान, कठुआ प्रकरणातील आरोपींची जम्मूतील भाजप आमदार चौधरी लाल सिंह यांनी पाठराखण केली होती. तर साध्वी प्रज्ञासिंह यांनी या प्रकरणात बलात्कार झाला नव्हता, तर केवळ हत्या झाली होती असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.