ADITYA-L1 : अभिमानास्पद! आता भारत सूर्याचा अभ्यास करणार, आदित्य एल 1 नियोजित ठिकाणी पोहचलं, इस्रोची यशस्वी झेप
ADITYA-L1 : आदित्य एल 1 हे लँग्रेज पॉईंट पोहचले असून पंंतप्रधान मोदी यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.
मुंबई : इस्रोकडून (ISRO) लाँन्च करण्यात आलेले आदित्य एल 1 (Aditya L1) हे यान त्याच्या नियोजित ठिकाणी पोहचले आहे. यामुळे भारताला आता सूर्याचा अभ्यास करता येईल. आदित्य L-1 हे L-1 बिंदूवर पोहोचलं आहे. सूर्याच्या L-1 बिंदूला halo orbit म्हणतात. 2 सप्टेंबर 2023 मध्ये इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य L-1 हे अंतराळात पाठवले होते.
India creates yet another landmark. India’s first solar observatory Aditya-L1 reaches it destination. It is a testament to the relentless dedication of our scientists in realising among the most complex and intricate space missions. I join the nation in applauding this…
— Narendra Modi (@narendramodi) January 6, 2024
कसा होणार सूर्याचा अभ्यास?
आदित्य एल1 मध्ये सात पेलोड्स बसवण्यात आले आहेत. यामधील चार पेलोड्स हे थेट सूर्याचा अभ्यास करणार आहेत. तर उर्वरित तीन हे वातावरणाचा अभ्यास करतील. विशेष म्हणजे ग्रहणकाळात देखील सूर्याचा अभ्यास करण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नसल्याचं इस्रोच्या शास्रज्ञांकडून सांगण्यात येत आहे. सूर्य हा एक तारा आहे. त्यामुळं सूर्यावर सतत काही ना काही स्फोट होत असतात. पण या कोणत्याही स्फोटांचा परिणाम या यानावर होणार नाही. सूर्यामधील अनेक रहस्यांचा उलगडा करण्यास हे यान इस्रोला मदत करेल.
सूर्याचे पहिले चित्र फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये मिळणार
आदित्य-L1 वरून सूर्याचे पहिले चित्र फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये मिळणार आहे. VELC ची निर्मिती भारतीय खगोल भौतिकी संस्थेने केली आहे. इस्रोच्या सन मिशनमध्ये स्थापित VELC सूर्याचे एचडी फोटो घेईल. L1 पर्यंतचा प्रवास पूर्ण केल्यानंतर आदित्यचे सर्व पेलोड्स चालू होतील. म्हणजे त्यात बसवलेली सर्व उपकरणे सक्रिय होतील. त्यानंतर आदित्य सूर्याचा अभ्यास सुरू करेल. या दरम्यान, आदित्यवरील सर्व उपकरणे सुरळीतपणे सुरू आहेत की नाही, याची चाचणीदेखील इस्रोकडून करण्यात येणार आहे. आदित्य L-1 मध्ये विशेष यंत्रणा तयार करण्यात आली आहे, जेणेकरुन कोणत्याही परिस्थितीत यान सूर्याच्या कक्षात टिकू शकेल. आदित्य L-1 ची रचना खास प्रकारे करण्यात आली आहे, ते सूर्याच्या फार जवळ जाणार नाही, पण लॅरेंज पॉईंटवर राहील आणि सूर्यावर संशोधन करेल. आदित्य L-1 ही एक प्रकारे स्पेस टेलिस्कोप आहे, जी स्पेसमध्ये खास पद्धतीने काम करेल.
आदित्य-L1 ला लॅग्रेंज पॉईंटवर पाठवलं
इटालियन-फ्रेंच गणितज्ञ जोसेफ लुई लॅग्रेंज यांच्या नावावरून लॅग्रेंज पॉईंट्सची नावे आहेत. सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये पाच लॅग्रेंज पॉईंट आहेत. यातील L1 वर हे यान पाठवण्यात आलं आहे. पृथ्वीपासून L1 चे अंतर सुमारे 1.5 दशलक्ष म्हणजेच 15 लाख किलोमीटर आहे. म्हणजेच आदित्य-एल1 पृथ्वीपासून तब्बल 15 लाख किलोमीटर दूर पाठवण्यात आलंय.