ISRO Solar Mission: मिशन आदित्यमध्ये महिलांचं योगदान, कोण आहेत निगार शाजी अन् अन्नपूर्णा सुब्रमण्यम?
ISRO Solar Mission: इस्रोच्या मिशन आदित्यमध्ये दोन महिला वैज्ञानिकांचा देखील सहभाग होता. निगार शाजी आणि अन्नपूर्णी सुब्रमण्यम सुरुवातीपासूनच या मोहीमेशी जोडल्या गेल्या होत्या.
श्रीहरिकोटा : आदित्य एल-1 (Aaditya L1) हे यान शनिवारी (2 सप्टेंबर) रोजी यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आलं. या मोहीमेच्या यशामध्ये महिलांचा देखील तितकचा सहभाग आहे. पण यामध्ये शास्त्रज्ञ निगार शाजी आणि अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांचं विशेष कौतुक करण्यात येत आहे. या दोघींनी देखील या मोहीमेमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, निगार शाजी या मोहीमेच्या संचालिका असून त्यांच्या नेतृ्त्वाखील ही मोहीम सुरु करण्यात आली. त्यांनी मिशनच्या प्रक्षेपण केले आहे. तर अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांनी आदित्य एल1 ची रचना करण्यात विशेष योगदान दिले आहे. दरम्यान, ही मोहीम यशस्वी होणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
निगार शाजी यांचा परिचय
निगार शाजी या तामिळनाडूच्या तेनकासी जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबामध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या. निगार शाजी या इस्रोमध्ये रिमोट सेन्सिंग, कम्युनिकेशन्स आणि इंटरप्लॅनेटरी सॅटेलाईट प्रोग्राममध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. तिरुनवेल्ली शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामधून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी रांचीच्या बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून पदव्युत्तर शिक्षण घेतले. 1987 साली त्यांचा प्रवास सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये सुरु झाला.
स्वप्न पूर्ण झालं : निगार शाजी
आदित्य-एल1 मिशनच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर निगार शाजी यांनी प्रतिक्रिया देत स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, पीएसएलव्ही द्वारे आदित्य एल-1 हे यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले. हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखं वाटतयं. जेव्हा आदित्य एल-1 सूर्याचा अभ्यास करण्यास सुरुवात करेल तेव्हा संपूर्ण देशासाठी ही आनंदाची पर्वणी ठरणार आहे. निगार शाजी यांनी इस्रोच्या रिमोट सेन्सिंग कार्यक्रमातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी रिसोर्ससॅट-2ए मध्ये सहयोगी प्रकल्प संचालिका म्हणून काम केले आहे. रिसोर्ससॅट-2ए हा राष्ट्रीय संसाधन निरीक्षण आणि व्यवस्थापनासाठी रिमोट सेन्सिंग उपग्रह आहे.
कोण आहेत अन्नपूर्णा सुब्रमण्यम?
अन्नपूर्णा सुब्रमण्यम या आदित्य एल-1 मध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या आणखी एक महिला शास्त्रज्ञ आहेत. केरळच्या पल्लकड जिल्ह्यात त्यांचं बालपण गेलं. त्यांच्या कुटुंबाला सांगतिक वारसा लाभला आहे. अन्नपूर्णी सुब्रमण्यम या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्सच्या संचालिका आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत या संस्थेने आदित्य एल-1 या अंतराळयानातील प्राथमिक उपकरणे विकसित केली आहे.
अन्नपूर्णा सुब्रमण्यम यांनी पीएचडीचे शिक्षण आईआईएमधून पूर्ण केले आहे. त्या स्टार क्लस्टर्स, स्टार स्ट्रक्चर्स, गॅलेक्टिक स्ट्रक्चर्स, मॅगेलेनिक क्लाउड्स या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. यावेळी प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं आहे की, या मोहिमेमुळे आम्हाला पहिल्यांदाचा सूर्याचा सखोल अभ्यास करणं शक्य होणार आहे. तसेच सूर्यग्रहणाच्या कालावधीमध्येही संपूर्ण सूर्य पाहण्यास आदित्य एल-1 सक्षम असणार आहे.
भारतीय अंतराळ संस्था म्हणजेच इस्रो ने शनिवार सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी श्रीहरीकोट येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आदित्य एल-1 प्रक्षेपण केले आहे. सूर्याचा अभ्यास करणारी पहिली अंतराळ मोहीम असल्याचं यावेळी इस्रोकडून सांगण्यात आलं आहे.