काय म्हणता? प्रवाशांचा डेटा विकून इंडियन रेल्वे पैसे कमावणार! IRCTCच्या नव्या टेंडरमुळं चर्चा
IRCTC Sell User Data: आता इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात IRCTCच्या एका निर्णयामुळं पुन्हा आपल्या डेटाबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
IRCTC Sell User Data: आजकाल आपल्या डेटावर कधी कुणी हक्क सांगेन याबाबत सांगता येत नाही. तसंही डिजिटलच्या युगात आपला डेटा (Digital Data) कितपत सुरक्षित आहे याविषयी साशंकताच आहे. आता इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात IRCTCच्या एका निर्णयामुळं पुन्हा आपल्या डेटाबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. IRCTCकडे असलेल्या ग्राहकांचा प्रचंड मोठ्या प्रमाणातील डेटा विकून 1000 कोटी रुपयांचा महसूल मिळवण्याची योजना IRCTC आखत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी महामंडळाने सल्लागार नेमण्यासाठी निविदा काढल्या आहेत. या निविदेवरुन सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.
नुकत्याच निघालेल्या एका टेंडरमध्ये असे म्हटले आहे की, IRCTC कडे डिजिटल डेटाचे विशाल भांडार आहे, ज्या माध्यमातून जास्तीत जास्त कमाईच्या शक्यता आहेत. हा डेटा एक प्रकारची संपत्ती आहे. या मालमत्तेचा वापर करुन महसूल वाढ करण्यासाठी महामंडळाची इच्छा आहे. या डिजिटल डेटाचे मुद्रीकरण करून 1000 कोटी रुपयांपर्यंतचा निधी उभारला जाऊ शकतो. यासाठी, त्याला एक सल्लागार कंपनी नियुक्त करायची आहे.
ही कंपनी जी डेटाच्या माध्यमातून कमाईच्या संधींसंदर्भात मार्गदर्शन करेल. आयआरसीटीकडे प्रवाशांचे फोन नंबर, घराचे पत्ते, बँक खाते यासारखा अत्यंत गोपनीय असलेला डेटा आहे. हा डेटा कुण्या त्रयस्थांकडे जाणार नाही याची आपण नेहमीच काळजी घेतो. मात्र जर आयआरसीटीसीने हा डेटा शेअर केला तर तो ग्राहकांचा विश्वास तोडल्यासारखे असेल, असं देखील बोललं जात आहे.
इंटरनेट फ्रीडम फाऊंडेशननं (Internet Freedom Foundation) म्हटलं आहे की, रेल्वे प्रवाशांनो, तुमचा डेटाच्या माध्यमातून लवकरच सरकारद्वारे कमाई केली जाणार आहे. आणि तेही, डेटा संरक्षण कायदा केला नसताना! आयआरसीटीसीनं डिजिटल डेटा कमाईसाठी सल्लागार नियुक्त करण्यासाठी एक निविदा काढली आहे. याचा अर्थ काय आहे? असं इंटरनेट फ्रीडम फाऊंडेशननं म्हटलं आहे.
🚨ALERT: Hey train travellers, your data will soon be monetised by the govt. & that too, in the absence of a data protection legislation! @IRCTCofficial has uploaded a tender to appoint a consultant for digital data monetisation.🧵on what this means. 1/8https://t.co/YbyF0tazZi pic.twitter.com/x9vMfGlKxC
— Internet Freedom Foundation (IFF) (@internetfreedom) August 19, 2022
कुणाच्या वैयक्तिक गोपनीयतेचा भंग होणार नाही
IRCTC ने सल्लागार पदाच्या सेवेसाठी निविदेत सामील होण्यासाठी 29 ऑगस्ट ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. तर दुसरीकडे IRCTCच्या अधिकार्यांनी सांगितले की, एजन्सीकडून वैयक्तिक ग्राहकांशी संबंधित डेटाचा वापर करुन कमाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही फक्त सल्लागाराच्या नियुक्तीसंदर्भात निविदा काढली आहे, जो सध्याचे कायदे लक्षात घेऊन डेटाच्या माध्यमातून कमाईसाठी रोड मॅपचा अभ्यास करेल आणि सूचना करेल. यामध्ये कुणाच्या वैयक्तिक गोपनीयतेचा भंग होणार नाही, असं अधिकाऱ्यानं सांगितलं.
IRCTC कडे वापरकर्त्यांचा 100TB पेक्षा जास्त डेटा
IRCTC कडे वापरकर्त्यांचा 100TB पेक्षा जास्त डेटा आहे. यामध्ये तिकीट बुक करण्यासाठी नावापासून ते फोन नंबर, पत्त्यांपर्यंत सर्व तपशील उपलब्ध आहेत. आता अशीही चर्चा आहे की, सरकार त्यांचे वैयक्तिक तपशील विकून पैसे कमविण्याचा विचार करीत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या