PM Modi : भारतातील जास्तीत-जास्त शहरे वॉटर प्लस बनविण्याचे उदिष्ठ : पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते आज आशियातील सर्वात मोठ्या बायो सीएनजी प्लांटचे उद्घाटन करण्यात आले.
Indore Bio CNG Plant : "स्वच्छ भारत अभियानांतर्गत भारतातील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. जेथे स्वच्छता असते, तेथे पर्यटन असते आणि जेथे पर्यटन असते तेथे नवीन अर्थव्यवस्था चालत असते. त्यामुळे भारतातील जास्तीत जास्त शहरे वॉटर प्लस (कोणतीही प्रक्रिया न केलेले सांडपाणी बाहेर सोडले जाणार नाही) बनवण्याचे केंद्र सरकारचे उदिष्ठ आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आशियातील सर्वात मोठ्या बायो सीएनजी प्लांटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते. मध्य प्रदेशची राजधानी इंदूर येथे या प्लांटचे उद्घाटन झाले. पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "सात ते आठ वर्षांपूर्वी भारतात पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण केवळ एक ते दोन टक्के होते. आज पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याची टक्केवारी आठ टक्केच्या आसपास आहे. वायू प्रदूषण आणि जलप्रदूषण शहरांसाठी आजारांचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात या समस्येला तोंड देण्याचे काम सुरू आहे. इंदूर हे एक स्वच्छ शहर आहे. त्यामुळेच स्वच्छतेचे किती काम या शहरात झाले आहे? हे पाहण्यासाठी अनेक लोक इंदूरला येत असतात. याच धर्तीवर देशातील जास्तीत जास्त शहरे स्वच्छ करण्यासाठी कोणतीही प्रक्रिया न केलेले सांडपाणी बाहेरील वातावरणात सोडले जाणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. त्यासाठीच जास्तीत जास्त शहरे वॉटर प्लस बनवण्याचे केंद्राचे उदिष्ठ आहे.
"शहरातील घरांमधून निघणारा ओला कचरा आणि खेड्यांतील जनावरे व शेतातील कचरा, हे सर्व एक प्रकारे शेणच आहे. शहरातील कचरा आणि पशुधनापासून गोबर धन, मग शेणापासून स्वच्छ इंधन, त्यानंतर स्वच्छ इंधनापासून ऊर्जा, ही साखळी जीवन धन तयार करते. त्यामुळेच येत्या दोन वर्षांत देशातील 75 मोठ्या महापालिकांमध्ये असे गोवर्धन बायो-सीएनजी प्लांट उभारण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंदूरमधील देवगुराडिया ट्रेंचिंग ग्राउंडवर वेस्ट टू वेल्थ गोबर-धन योजनेअंतर्गत बायो-सीएनजी प्लांटचे उद्घाटन केले. या गोबर-धन प्लांटमध्ये दररोज 550 टन ओल्या सेंद्रिय कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut on ED: केंद्रीय यंत्रणांची कार्यालये खंडणीखोर; पुढील आठवड्यात ईडीचा मोठा घोटाळा काढणार; संजय राऊत यांचा इशारा
- Top 10 CNG Car : सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या भारतातल्या टॉप 10 सीएनजी कार
- Tata Tiago CNG : टाटा मोटर्सच्या टियागो व टिगोरमध्ये प्रगत सीएनजी तंत्रज्ञान लाँच