Birsa Munda : आदिवासींच्या जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कासाठी लढणारे महान क्रांतीकारक बिरसा मुंडा
Birsa Munda Death Anniversary : बिरसा मुंडा यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी ब्रिटिशांशी आणि मिशनऱ्यांशी लढा दिला. अवघ्या 24 व्या वर्षी त्यांनी आपल्या प्राणाची आहूती दिली.
Birsa Munda Death Anniversary : भारतीय स्वांतत्र्य लढ्यातील क्रांतीकारक आणि आदिवासींच्या हक्कांसाठी लढणारे बिरसा मुंडा यांची आज पुण्यतिथी साजरी केली जात आहे. केवळ 24 व्या वर्षी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या बिरसा मुंडांनी एक वेगळीच छाप उमटवली आहे.
1857 चा उठाव दडपल्यानंतरही भारतातील वेगवेगळ्या प्रदेशात ब्रिटिशांविरोधात उठाव सुरु झाले होते. त्यामध्ये 1895 ते 1900 सालाच्या दरम्यान मध्य भारतातील, छोटा नागपुरच्या प्रदेशात बिरसा मुंडा यांनी सुरु केलेली 'उलगुलान' चळवळ ही महत्वाची आहे. देशावर राज्य करणारे इंग्रज आणि आदिवासींचे धर्मांतर करणारे मिशनरी या दोघांच्या विरोधात लढा देण्यात बिरसा मुंडा यांनी आपले जीवन व्यतीत केलं.
ब्रिटिशांनी आपल्या आर्थिक फायद्यासाठी आदिवासींच्या जंगलावर अतिक्रमण करायला सुरुवात केली. त्यावेळी आदिवासींच्या जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी बिरसा मुंडे पुढे आले. आदिवासी अस्मिता, आदिवासी संस्कृती आणि स्वायत्तता यांच्या रक्षणासाठी त्यांनी क्रांतीचे हत्यार उचललं. त्यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी उलगुलान चळवळ सुरु केली. त्या दरम्यान बिरसा मुंडा आणि ब्रिटिशांमध्ये अनेकवेळा चकमकी झाल्या.
शेवटी जानेवारी 1900 डोंबरीच्या पर्वतावर त्यांच्यामध्ये आणि ब्रिटिशांमध्ये झालेल्या चकमकीत त्यांना अटक करण्यात आली. या चकमकीदरम्यान अनेक स्त्रिया आणि बालकांचा मृत्यू झाला. ब्रिटिशांनी बिरसा मुंडा यांना तुरुंगात टाकलं आणि तिथेच त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. ब्रिटिशांनी त्यांना विषप्रयोग करुन मारलं असं अनेक अभ्यासकांना मत नोंदवलं आहे.
बिरसा मुंडा यांना आदिवासी समाजात देवाचं स्थान प्राप्त आहे. त्यांनी झारखंड, बिहार, छत्तीसगड, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या आदिवासींच्या हक्कांच्या रक्षणासाठी आपले बलिदान दिलं. बिरसा मुंडा यांच्या या योगदानाची दखल घेत भारत सरकारने संसदेत त्यांचे चित्र लावलं आहे. बिरसा मुंडा हे एकमेव आदिवासी नेते आहेत ज्यांचे चित्र संसदेत लावण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या :