India Pakistan War: भारताची लढाऊ विमानं पाकिस्तानमध्ये घुसली, तीन हवाई तळांवर तुफान हल्ला, मोठं नुकसान
India Fighter jets attack on Pakistan: पाकिस्तानकडून शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा भारतावर मोठा हवाई हल्ला करण्यात आला. यावेळी पाकिस्तानी सैन्याने फतेह 1 क्षेपणास्त्र सोडले होते.

India Fighter jets attack on Pakistan: पाकिस्तानकडून शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करण्यात आले. यामध्ये पाकिस्तानच्या (Pakistan) बहुचर्चित फतेह-1 या मिसाईलचाही समावेश होता. यानंतर आता भारतीय सैन्याने (Indian Army) पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. भारतीय वायूदलाची लढाऊ विमाने शनिवारी सकाळी पाकिस्तानमध्ये घुसली आहेत. या विमानांनी पाकिस्तानच्या तीन ते चार हवाई तळांवर हल्ले केले आहेत.
रावळपिंडीलगतच्या नूर खान हवाई तळाला भारताच्या लढाऊ विमानांनी लक्ष्य केले आहे. याशिवाय, मुरीद आणि सुकूर या हवाई तळांवरही भारतीय हवाईदलाच्या लढाऊ विमानांनी हल्ला चढवला आहे. या हवाई हल्ल्यात पाकिस्तानचे खूप मोठे नुकसान झाले आहे. भारतीय वायूदलाने पाकिस्तानचे 3 एअरबेस (Pakistan Air base) उद्ध्वस्त केल्याने आता येथून पाकिस्तानच्या लढाऊ विमानांना उड्डाण करता येणार नाही. याचा फटका पाकिस्तानला बसणार आहे.
पाकिस्तानकडून शुक्रवारी रात्री भारताच्या 4 हवाई तळांवर हल्ले केले होते. पाकिस्तानकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला होता. यामध्ये पाकिस्तानच्या फतेह-1 या क्षेपणास्त्राचाही वापर करण्यात आला. मात्र, भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हे सर्व हल्ले परतवून लावले आहेत. उधमपूर आणि पठाणकोट येथील हवाई हद्दीत पाकिस्तानची फायटर जेटस् शिरली होती. भारताच्या प्रतिहल्ल्यात पठाणकोट येथे पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडण्यात आले आहे. पाकिस्तानने भारताच्या एकूण सहा हवाई तळांना लक्ष्य करण्यात आले. यासाठी पाकने ड्रोनचा वापर केला होता. हरियाणातील सिरसा हवाई तळावरही पाकिस्तानने हल्ला केला होता. मात्र, भारतीय सैन्याने याठिकाणी डागण्यात आलेले क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केले.
भारताच्या कोणत्या हवाई तळांवर पाकिस्तानकडून हल्ले?
जम्मू एअर बेस
उधमपूर एअर बेस
पठाणकोट एअर बेस
श्रीनगर एअर बेस
बियास एअर बेस
पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी बैठक
पंतप्रधान मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते. तब्बल अडीच तास ही बैठक सुरु होती. भारतीय सैन्याकडून थोड्याचवेळात पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. त्यावेळी भारतीय लष्कर काय माहिती देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा
मोठी बातमी: पाकिस्तानकडून दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न; फतेह 1 क्षेपणास्त्र भारतावर डागले
अमृतसर-जैसेलमेरवर ड्रोन हल्ल्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; भारताकडून सर्व हल्ले निकामी























