India Pakistan War : अमृतसर-जैसेलमेरवर ड्रोन हल्ल्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; भारताकडून सर्व हल्ले निकामी
Pakistan Drone Attack On India : पाकिस्तानने नागरी विमानांच्या आड भारतावर ड्रोन हल्ले सुरू केले असून उरी सेक्टरमध्येही गोळीबार केल्याचं समोर आलं आहे.

नवी दिल्ली : या आधी तोंडावर आपटूनसुद्धा पाकिस्तान सुधारला नसल्याचं दिसून येतंय. गुरुवारी केलेले सर्व ड्रोन हल्ले अपयशी ठरल्यानंतर पाकिस्तानने शुक्रवारी रात्रीही तोच कित्ता गिरवल्याचं दिसतंय. अमृतसर आणि जैसेलमेर या शहरांवर पाकिस्तानने ड्रोन हल्ला केला. या दोन्ही ठिकाणचे हल्ले भारताने परतवून लावल्याची माहिती आहे.
अमृतसरमध्ये जगप्रसिद्ध सुवर्णमंदिर असून त्याला पाकिस्तान लक्ष्य करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमृतसरमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. जैसलमेरमध्येही पाकिस्तानचा पुन्हा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचं दिसतंय. पाकिस्तानचे चार ड्रोन भारतानं पाडले. दरम्यान, राजस्थानच्या बाडनेरमध्येही संपूर्ण ब्लॅकआऊट करण्यात आलं आहे.
नागरी विमानांच्या आड पाकिस्तानचा हल्ला
गुरुवारपासून पाकिस्तानची आगळीक सुरूच असून पाकिस्तानकडून वेगवेगळ्या शहरांमध्ये गोळीबार सुरू केला आहे. त्याला भारतीय सैन्याने जशास तसं उत्तर दिलं. गुरुवारी रात्री भारताच्या जवळपास 36 ठिकाणांवर ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न केला. भारताने पाकिस्तानचे हे हल्ले निष्प्रभही केले. पण भारतावर हल्ला करणाऱ्या पाकिस्तानने, सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ केल्याचे पुरावे भारताने समोर आणले.
भारताने प्रतिहल्ला करू नये म्हणून, पाकिस्तानने नागरी विमानांसाठी हवाईहद्द बंद केली नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना, नागरी विमानांना आणि नागरिकांना नुकसान होऊ नये म्हणून भारताने सावध पावलं उचलत पाकला प्रत्युत्तर दिलं.
पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला निष्क्रिय
जम्मू, सांबा आणि पठाणकोटमध्येही ड्रोन दिसल्याची पुष्टी झाली आहे. सुरक्षा दलांनी या ड्रोन हालचालींवर तात्काळ कारवाई केली आणि त्यांना निष्क्रिय केले. संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
पाकिस्तानकडून झालेल्या ड्रोन हल्ल्याचा व्हिडीओही समोर आला आहे. सुरक्षा दलांनी लगेच प्रत्युत्तर दिले आणि हवेत इंटरसेप्टर क्षेपणास्त्र सोडले. स्फोटाचा हलका आणि सौम्य आवाज दूरवरून स्पष्टपणे ऐकू येतो, ज्यामुळे ड्रोन निष्क्रिय होतो. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि लष्कराने शोध मोहीम सुरू केली आहे.
भारतीय सुरक्षा दलांनी जम्मू आणि राजस्थानमधील पोखरणमध्ये संशयास्पद ड्रोन घुसखोरी यशस्वीरित्या उधळून लावली. हाय अलर्ट दरम्यान, ड्रोनला अडवण्यात आले आणि निष्क्रिय करण्यात आले, ज्यामुळे संभाव्य धोका टळला.
मोदींची तीनही सेनादलांच्या प्रमुखांशी चर्चा
मोदींची तिन्ही सैन्याच्या माजी प्रमुखांशी सुरु असलेली बैठक संपली, राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात मोदींची सैन्याच्या माजी प्रमुखांशी चर्चा , पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी बैठकीतून रणनीती .
उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानचा गोळीबार
उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून जोरदार तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला. या परिसरातील सैन्य ठिकाणांसह सर्वसामान्यांना पाककडून टार्गेट करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय.
तुर्कस्तानचे ड्रोन वापरून पाकिस्तानचा हल्ला
भारतावर गुरुवारी पाकिस्तानने 400 हून अधिक ड्रोनद्वारे हल्ला केला. पाकिस्तानने भारतावर स्वार्म ड्रोनद्वारे हल्ला केला होता. धक्कादायक म्हणजे लडाखपासून गुजरातपर्यंत तब्बल 36 ठिकाणांवर पाकिस्तानने हा हल्ला केल्याचं उघड झालं. स्वार्म ड्रोन्सचं वैशिष्ट्य म्हणजे एकत्र झुंडीने हे ड्रोन्स एकाचवेळी हल्ला करतात. या ड्रोन्सवर वॉरहेड नसतात तर छर्रे असतात. मात्र या छऱ्यांमुळे जीवघेणी हानी जास्त होते असं सांगितलं जातं. या स्वार्म ड्रोन्स व्यतिरिक्त काही मोठे ड्रोन तसंच तुर्कस्तानने दिलेले ड्रोन्सही पाकिस्तानने वापरले होते. भारतानं देखील चार ड्रोन्सच्या माध्यमातून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं. आणि पाकिस्तानची एक रडार सिस्टीम उद्ध्वस्त केली.























