(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India weather : मुसळधार पावसाचा उत्तराखंडसह हिमाचलला मोठा फटका, आत्तापर्यंत 65 जणांचा मृत्यू, आज पावसाचा रेड अलर्ट
उत्तर भारतात मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळं उत्तराखंड (Uttarakhand) आणि हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) 65 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
India weather : देशाच्या अनेक भागात मुसळधार पावसानं (Heavy rainH) धुमाकूळ घातला आहे. काही भागात पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: उत्तर भारतात (North India) मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळं उत्तराखंड (Uttarakhand) आणि हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) 65 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. दोन्ही राज्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पायाभूत सुविधांसह शेती पिकांचं मोठं नुकसान
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या दोन्ही राज्यांमध्ये भूस्खलन, पूर, ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पाऊस आणि भूस्खलनामुळे येथील पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत. तसेच या दोन्ही राज्यात शेती पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. पूरस्थिती निर्माण झाल्यामुळं हिमाचलमध्ये स्वातंत्र्यदिनाचे कोणतेही कार्यक्रम घेण्यात आले नाहीत. साध्या पद्धतीनं सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नव्हते. शिमल्यामध्ये भूस्खलन झाल्याने शिव मंदिर कोसळून आत्तापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे.
हिमाचल प्रदेशात 55 जणांचा मृत्यू झाला
सोमवारपासून सुरु असलेल्या पावसामुळं हिमाचल प्रदेशमध्ये आतापर्यंत सुमारे 55 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. अडकलेल्या लोकांची सुटका करण्यावर भर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. चंदीगड-शिमला 4-लेन महामार्गासह इतर प्रमुख रस्ते खुले करण्यात आले आहेत.
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी 16 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय राजधानीत हवामान स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे. तसेच कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 28 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. या संपूर्ण आठवड्यात दिल्लीत पाऊस पडणार नसून, वातावरण आल्हाददायक राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर उत्तर प्रदेशात मान्सून अजूनही सक्रिय आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
या भागात पावसाची शक्यता
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज ( 16 ऑगस्ट) आणि उद्या (17 ऑगस्ट) रोजी राजस्थानच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच बिहार, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयच्या काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: