(Source: ECI/ABP News/ABP Majha)
डोनाल्ड ट्रम्प भारतात येण्याआधी अमेरिकी सीक्रेट सर्व्हिसचे एजंट दाखल; दौऱ्यासाठी करणार नियोजन
मोटेरा स्टेडियममध्ये 'केम छो ट्रम्प' कार्यक्रमादरम्यान 1 लाख 10 हजारहून अधिक लोक उपस्थित राहणार आहेत. स्टेडियममध्ये एक लाक लोकांच्या बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मोठा स्टेज उभारण्यात येणार आहे.
अहमदाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारीला दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प देखील असणार आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एक जनसभाही करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमध्ये ही सभा होण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प पत्नी मेलानिया सोबत अहमदाबाद आणि नवी दिल्ली येथे जाणार आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार असून त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे. परंतु, डोनाल्ड ट्रेम्प भारत भूमीवर पाय ठेवण्याआधीच जमिनीपासून आकाशापर्यंत त्यांच्या सुरक्षा एजन्सी अॅक्टिव्ह झाल्या आहेत. सुरक्षा व्यवस्था पाहण्यासाठी अमेरिकेतील सीक्रेट सर्विसचं एक विशेष विमान सोमवारी अहमदाबाद येथे पोहोचलं. सुरक्षेसंदर्भातील उकरणांसोबत सीक्रेट सर्विसचे एजंट्स अहमदाबादमधील हयात हॉटेलमध्ये थांबले आहेत. अहमदाबाद येथे पोहोचल्यानंतर डोनाल्ड ट्रंप विमानतळावरून साबरमती आश्रमात जाणार असून त्यानंतर जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन करणार आहेत.
अहमदाबादमध्ये पीएम मोदी आणि ट्रम्प जवळपास 22 किलोमीटरचा प्रवास रस्तामार्गाने करणार आहेत. जगातील सर्वात मोठी महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव मोटेरा स्टेडियममधील प्रत्येक कोपरा CCTVच्या नजरेत असणार आहे. रोड शो दरम्यान एनएसजी कमांडो आणि अमेरिकेतील स्नायपर्स ठिकठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत.
हेलिकॉप्टरच्या माध्यमातून शहरात गस्त घालणार
ट्रम्प यांच्या दौऱ्यामुळे हेलीकॉप्टरमार्फत संपूर्ण शहरात चोख बंदोबस्त असणार आहे. तसेच अमेरिकन स्नायपर्स, सीसीटिव्ही यांमार्फत नजर ठेवण्यात येणार आहे. एवढचं नाहीतर संपूर्ण शहरावर हेलिकॉप्टरच्या मदतीने नजर ठेवली जाणार आहे. अहमदाबादमध्ये 11 हजारपेक्षा अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पीएम मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प साबरमती नदीवर काही वेळ थांबणार असल्याचीही माहिती मिळत आहे.
साबरमती नदी परिसरात विशेष कमांडो तैनात असतील. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यामुळे अहमदाबाद विमानतळावरील एअर ट्रॅफिक रोखण्यात येणार आहे. अहमदाबादहून जाणाऱ्या काही रेल्वे ट्रेन्सच्या मार्गातही बदल करण्यात येणार आहेत.
दरम्यान, मोटेरा स्टेडियममध्ये 'केम छो ट्रम्प' कार्यक्रमादरम्यान 1 लाख 10 हजारहून अधिक लोक उपस्थित राहणार आहेत. स्टेडियममध्ये एक लाक लोकांच्या बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मोठा स्टेज उभारण्यात येणार आहे. या स्टेजसमोर 14 हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
संबंधित बातम्या :
'फेसबुकवर मी नंबर वन, पंतप्रधान नरेंद्र मोदी नंबर टू', भारत दौऱ्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्वीट