'फेसबुकवर मी नंबर वन, पंतप्रधान नरेंद्र मोदी नंबर टू', भारत दौऱ्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्वीट
डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत. ट्रम्प आपल्या भारत दौऱ्यासाठी खुपच उत्सुक दिसत आहेत. भारत दौऱ्यादररम्यान दोन्ही देशांमध्ये व्यापारी करारावर स्वाक्षऱ्या होण्याचेही त्यांनी संकेत दिले आहेत.
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारीला दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प देखील असणार आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एक जनसभाही करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमध्ये ही सभा होण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प पत्नी मेलानिया सोबत अहमदाबाद आणि नवी दिल्ली येथे जाणार आहेत.
भारत दौऱ्यावर येण्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी लिहिलं की, "मार्क झुकेरबर्गने काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं की, डोनाल्ड ट्रम्प फेसबुकवर नंबर वन आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी नंबर टू आहेत. मी दोन आठवड्यांनतर भारतात जाणार आहे."
Great honor, I think? Mark Zuckerberg recently stated that “Donald J. Trump is Number 1 on Facebook. Number 2 is Prime Minister Modi of India.” Actually, I am going to India in two weeks. Looking forward to it!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) February 14, 2020
डोनाल्ड ट्रम्प आपल्या भारत दौऱ्यासाठी खुपच उत्सुक दिसत आहेत. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यादररम्यान दोन्ही देशांमध्ये व्यापारी करारावर स्वाक्षऱ्या होण्याचेही त्यांनी संकेत दिले आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा खास आहे. दोन्ही देशांची मैत्री आणखी मजबूत होण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचं 'एअरफोर्स वन' 24 फेब्रुवारीला दुपारी सरदार वल्लभाई पटेल एअरपोर्टवर उतरेल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी विमातळावर उपस्थित राहणार आहेत.
अहमदाबादमध्ये आल्यानंतर 24 फेब्रुवारीच्या रात्री डोनाल्ड ट्रम्प दिल्लीला रवाना होतील. दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 फेब्रुवारीला दिल्लीतील राष्ट्रपती भवनात त्यांचं स्वागत होईल. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चा होईल. यामध्ये जवळपास डझनभर करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे.
मोटेरा स्टेडियममध्ये 'केम छो ट्रम्प' कार्यक्रमादरम्यान 1 लाख 10 हजारहून अधिक लोक उपस्थित राहणार आहेत. स्टेडियममध्ये एक लाक लोकांच्या बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मोठा स्टेज उभारण्यात येणार आहे. या स्टेजसमोर 14 हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे.