(Source: ECI/ABP News/ABP Majha)
देशात कोरोनानं धरला वेग; राजधानीत एका दिवसांत पॉझिटिव्ह दर 10.9 टक्क्यांनी वाढला, तर महाराष्ट्रात दोघांचा मृत्यू
Coronavirus Updates: देशाच्या राजधानीसोबतच देशाच्या आर्थिक राजधानीतही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. दिल्लीत एकाच दिवसांत पॉझिटिव्ह दर 10.9 टक्क्यांनी वाढल्याचं पाहायला मिळत आहे.
Coronavirus Updates: सध्या देशात कोरोनानं (Covid-19) पुन्हा धाकधूक वाढवली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये दिवसागणिक कोरोनाबाधितांमध्ये (Corona) वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच केंद्र सरकारनंही यासंदर्भात काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. आरोग्यमंत्रालयानं काल (बुधवारी) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात 4,435 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यासोबतच देशात कोरोनाचा पॉझिटीव्हिटी रेट 3.38 टक्के नोंदवला गेला आहे. तर साप्ताहिक कोरोना संसर्ग दर देखील 2.79 टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, दिल्ली (Delhi) आणि महाराष्ट्रात (Maharashtra Corona Updates) कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत दिल्लीत कोरोना बाधितांमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.
गुरुवारी दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ दिसून आली. दिल्लीत 24 तासांत 509 लोक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर, दिल्लीतील पॉझिटिव्ह दर 26.54 टक्क्यांवर पोहोचला आहे. राजधानीच्या पॉझिटीव्हिटी दरात एकाच दिलसात मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. एका दिवसापूर्वी हा पॉझिटीव्हिटी दर 15.64 टक्के होता. म्हणजेच, 24 तासांत पॉझिटिव्हिटी दर 10.9 टक्क्यांनी वाढला आहे. दिल्लीतील आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, 1918 जणांची चाचणी करण्यात आली होती. ज्यामध्ये 509 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं आढळून आलं आहे. दरम्यान, दिल्लीत कोरोनामुळे एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. दिल्लीत सध्या 1795 सक्रिय रुग्ण आहेत.
महाराष्ट्रात घटले कोरोनाचे आकडे
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 569 जण पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र, एका दिवसापूर्वी राज्यात 711 जण पॉझिटिव्ह आले होते. आता राज्यातील कोविड-19 चे एकूण रुग्णसंख्या 81,46,870 वर पोहोचली आहे, तर मृतांची संख्या 1,48,451 वर पोहोचली आहे. आरोग्य विभागानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मुंबईत आहे. गेल्या 24 तासांत येथे 211 नवे रुग्ण आणि एक मृत्यू नोंदवला गेला, तर दुसरा मृत्यू पुण्यात झाला. महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसचा मृत्यू दर 1.82 टक्के आहे.
#कोविडसंसर्ग स्थिती: ०५ एप्रिल २०२३, सायंकाळी ६ वाजता #CovidUpdates : 05 April 2023, 6pm #कोरोनालाना #NaToCorona #CovidIsntOver pic.twitter.com/vBpeM1oR4I
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 5, 2023
घाबरू नका, खबरदारी बाळगा
कोरोनाता वाढता धोका पाहता गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन नीती आयोगानं केलं आहे. तसेच सोशल डिस्टंसिग पाळा आणि शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, असं आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात येत आहे. घाबरुन जाणू नका, तर खबरदारी घ्या, असा सल्ला आरोग्य विभागानं दिला आहे.
कोरोनाचा सामना करण्यासाठी चार T
गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाचा आलेख घसरला होता पण, आता पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने वेग पकडला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच आठवड्यात देशातील कोरोना संसर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मंत्रालयाने राज्यांना कोविडचा सामना करण्यासाठी चार T म्हणजेच टेस्ट-ट्रॅक-ट्रीट-टीकाकरण (लसीकरण) करण्याचा सल्ला दिला आहे. केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक तत्वेही जारी केली आहेत.