India Coronavirus Cases : कोरोना प्रादुर्भाव घट; गेल्या 24 तासांत 4369 नव्या रुग्णांची नोंद, अॅक्टिव्ह रुग्णसंख्येतही घट
India Coronavirus Cases : काल दिवसभरात देशात 5 हजारांहून कमी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 4 हजार 369 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
India Coronavirus Cases : देशात कोरोनाच्या (Coronavirus) प्रादुर्भावात मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात देशात 5 हजारांहून कमी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 4 हजार 369 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर एकूण कोरोना बाधितांची संख्या 4 कोटी 45 लाख 4 हजार 949 झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं (Ministry Of Health) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात सक्रिय रुग्णांची (Active Cases) संख्या 46 हजार 347 वर पोहोचली आहे.
मंत्रालयानं जारी केलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 3 लाख 50 हजार 468 चाचण्या झाल्या आहेत. जर आपण कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण आकडेवारी पाहिली तर ही संख्या 5 लाख 28 हजार 185 वर पोहोचली आहे. तसेच, देशात नोंदवलेल्या एकूण आकडेवारीपैकी 4 कोटी 39 लाख 30 हजार 417 लोक कोरोनामुक्त (Recovered) झाले आहेत.
देशात लसीकरण मोहीम जोमात
देशात कोरोना लसीकरण (Corona Vaccination) मोहीम सुरु असून नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या 24 तासांत 21 लाख 67 हजार 644 जणांचं लसीकरण करण्यात आलं असून, त्यानंतर देशभरात 215 कोटी 47 लाख 80 हजार 693 लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.
कोरोना रूग्णसंख्येत घट, सोमवारी राज्यात 414 नव्या रूग्णांची नोंद
गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत रोज घट होत आहे. सोमवारी राज्यात 414 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर एका कोरोना रूग्णाचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी राज्यात 1076 कोरोनाच्या रूग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर शुक्रवारी 955 रूग्णांची नोंद झाली होती. शनिवारी 734 नव्या रूग्णांची नोंद झाली होती. रविवारी राज्यात 701 नव्या रूग्णांची नोंद झाली होती. परंतु, यात घट होऊन आज 414 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. गेल्या चार दिवसांतील ही आकडेवारी पाहाता गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रूग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही राज्यासाठी दिलासादायक बाब आहे. रूग्णसंख्या कमी होत असली तरी अद्याप कोरोना संपूर्ण धोका टळलेला नाही त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
मुंबईत सोमवारी 128 रुग्णांची नोंद
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत सोमवारी 172 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,26,721 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98.1 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,719 झाली आहे. सध्या मुंबईत 1,666 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 128 रुग्णांमध्ये 117 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 3203 दिवसांवर गेला आहे.