अरुणाचल प्रदेशमध्ये चीनची घुसखोरी, एक गाव वसवलं; अमेरिकेच्या पेंटागॉनचा अहवाल
India China : गेल्या वर्षभरापासून भारत आणि चीनमध्ये सीमेवर शांतता राखण्यासाठी चर्चा सुरु आहे. पण या चर्चेतून सीमेवरील तणाव कमी झाला नसल्याचंही पेंटागॉनच्या (Pentagon) या अहवालात नमूद करण्यात आलंय.
नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशमध्ये चीननं एक गाव उभारल्याची धक्कादायक माहिती अमेरिकेच्या पेंटागॉनच्या (Pentagon) अहवालात देण्यात आलीय. अमेरिकन काँग्रेसला पेंटागॉननं सादर केलेल्या या वार्षिक अहवालात चीनच्या एलएसीवरील कारवायांचा उल्लेख करण्यात आलाय. अरुणाचल प्रदेशच्या भागात चीननं एक गाव उभारलं आहे आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दावा करण्यासाठी चीनकडून वाढत्या कारवाया सुरू असल्याचं पेंटागॉनच्या अहवालात नमूद करण्यात आलंय.
गेल्या वर्षभरापासून भारत आणि चीन या दोन्ही देशांत सीमेवर शांतता राखण्यासाठी चर्चा सुरु आहे. पण या चर्चेतून सीमेवरील तणाव कमी झाला नसल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलंय. एकीकडे भारतासोबत चर्चा सुरु ठेवायची आणि दुसरीकडे सीमेवर सैन्यबळ वाढवायचं असा डाव चीनचा असल्याचं उघड झालं आहे.
भारताच्या भूमीवर म्हणजे अरुणाचल प्रदेशवर चीन सुरुवातीपासूनच हक्क सांगतोय. भारताचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधानांच्या या भागातल्या दौऱ्याला चीनचा कायम विरोध असतो. पेंटॅगॉनने 'मिलिट्री अॅन्ड सिक्युरिटी डेव्हलपमेन्ट इन्व्हॉल्विंग द पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना' या शिर्षकाने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.
सीमेवर चीनकडून फायबर ऑप्टिक्सचे नेटवर्क तयार
गेल्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये भारताच्या उत्तर सीमेवरील लडाख या ठिकाणी भारत आणि चीनमध्ये सीमावादावरुन तणाव निर्माण झाला होता. पण यामध्ये भारताला गुंतवून ठेवायचं आणि हा चीनचा बनाव होता असं अमेरिकेच्या पेंटॅगॉनने त्यांच्या अहवालात सांगितलं आहे. ज्यावेळी चीनचा भारतासोबत वाद सुरु होता त्याचवेळी पश्चिम हिमालयाच्या परिसरात चीनकडून फायबर ऑप्टिक्सचे नेटवर्क निर्माण करण्यात येत होतं. संपूर्ण जगभरात कोरोनाच्या विरोधात लढाई सुरु असताना, तसेच भारत चीनसोबतच्या वादात गुंतला असताना चीन मात्र आपल्या लष्करी तयारीवर जोर देत होता.
महत्वाच्या बातम्या :