Malabar : चीनला शह देण्यासाठी 'क्वॉड' देश एकत्र, बंगालच्या उपसागरात मलबार युद्धसराव
इंडो-पॅसिफिक (Indo-Pacific) प्रदेशातील चीनची दादागिरी संपुष्टात आणण्यासाठी भारत-अमेरिका-जपान-ऑस्ट्रेलिया हे चार देश एकत्र आले आहेत.
Malabar : इंडो-पॅसिफिक हा समुद्री प्रदेश मुक्त आणि सुरक्षित राहिला पाहिजे, तसंच या प्रदेशातील सर्वांचे हितसंबंध समान जपलं पाहिजे यासाठी हिंदी महासागरातील बंगालच्या उपसागरात बुधवारपासून बंगालच्या उपसागरात क्वाड (Quad) देशांचा 'मलबार 21' (Malabar 21) हा युद्धाभ्यास सुरु झाला. या माध्यमातून भारत-अमेरिका-जपान-ऑस्ट्रेलिया हे चार देश एकत्र आले आहेत. या प्रदेशातील चीनच्या वर्चस्वाला शह मिळणार असल्याने त्याचा थयथयाट झाल्याचं चित्र आहे.
भारत आणि अमेरिका या दोन देशांच्या दरम्यान 1992 साली पहिल्यांचा 'मलबार' युद्धाभ्यासाला सुरुवात झाली. त्यानंतर 2015 साली यामध्ये जपान आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश करण्यात आला. इंडो-पॅसिफिक प्रदेश हा मुक्त आणि सुरक्षितच असायला पाहिजे यासाठी हे चार देश एकत्र आले. हिंदी महासागराच्या पट्ट्यात चीनचे वर्चस्व वाढत आहे. त्यामुळे एकमेकांना सहकार्य केलं तर या प्रदेशातील मूल्ये आणि या प्रदेशाची सुरक्षितता कायम राहील असं भारताचं आणि इतर तीन देशांचं मत आहे.
इंडो-पॅसिफिक प्रदेशातील लोकशाही मूल्ये, स्वातंत्र्यता आणि विकासाच्या मुद्द्यावर हे देश एकत्रित येत आहेत. भारताच्या वतीनं या युद्धाभ्यासात INS रणविजय आणि INS सातपुडा तसेच P81 फ्लीट एअरक्राफ्ट सहभागी झालं आहे.
येत्या काळात क्वॉड देशांची सहमती असेल तर मलबार युद्धाभ्यासामध्ये इतर काही मित्र देशांचाही सहभाग केला जावू शकतो असं अमेरिकेच्या नौदल प्रमुखांनी म्हटलं आहे.
क्वाड देशांच्या या युद्धाभ्यासामुळे चीनचा मात्र थयथयाट झाल्याचं चित्र आहे. चीनने वेळोवेळी मलबार युद्धाभ्यासाला विरोध केला आहे. या वर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या क्वॉड देशांच्या युद्धाभ्यासात फ्रान्सनेही भाग घेतला होता.
हिंदी महासागरातील संपूर्ण वर्चस्वासाठी चीनने पावले उचलायला सुरुवात केली असून या भागातील अनेक देशांच्या सीमांवर आपले नौदल तैनात केलं आहे. चीनच्या या वाढत्या वर्चस्वाला शह देण्यासाठी भारत-अमेरिका-जपान-ऑस्ट्रेलिया या क्वाड देशांचा प्रयत्न आहे.
भारतीय नौदलाकडून 2030 सालापर्यंत संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी सहा आण्विक पाणबुड्यांसह 24 नव्या पाणबुड्या खरेदी करण्यात येणार आहे. सध्या भारताकडे 15 परंपरिक पाणबुड्या आणि दोन आण्विक पाणबुड्या आहेत. चीनकडे सध्या 50 पाणबुड्या असल्याचं सांगण्यात येतंय.
महत्वाच्या बातम्या :