(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लडाखमधील परिस्थिती कशी? LAC वर आतापर्यंत काय काय झालं?; राजनाथ सिंह निवेदन देणार
भारत आणि चीन यांच्यात एलएसीवर सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज लोकसभेत निवेदन देणार आहेत. लडाखमधील परिस्थिती कशी आहे, एलएसीवर आतापर्यंत काय काय झालं याबाबत संरक्षण मंत्री आज दुपारी तीन वाजता सभागृहात माहिती देणार आहेत.
नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यात एलएसीवर सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज लोकसभेत निवेदन देणार आहेत. एलएसीवरील सध्याची परिस्थिती कशी आहे याबाबत राजनाथ सिंह आज दुपारी तीन वाजता सभागृहात माहिती देणार आहेत. चीन करत असलेल्या घुसखोरीवरुन विरोधक सातत्याने सरकारवर हल्लाबोल करत प्रश्न विचारत आहेत. लोकसभेत कालही विरोधकांनी सीमेवरील तणावाचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला होता. कोरोना संकटात संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी (14 सप्टेंबर) सुरुवात झाली.
लोकसभेत आजचा दिवस महत्त्वाचा लोकसभेत आजचा दिवस महत्त्वाचा ठरु शकतो. भारत-चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मौन सोडावं अशी मागणी विरोधक वारंवार करत आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर अनेक वेळा निशाणा साधला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आज राजनाथ सिंह लोकसभेत भारत-चीन मुद्द्यावर निवेदन देऊ शकतात.
अधीर रंजन चौधरींकडून सोमवारी भारत-चीन मुद्दा उपस्थित लोकसभा सोमवारी चर्चेदरम्यान काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी भारत-चीन सीमा वादाचा मुद्दा उपस्थित केला. "अनेक महिन्यांपासून भारतातील लोक मोठ्या तणावात आहे, कारण आपल्या सीमेत चीन...असं अधीर रंजन चौधरी यांनी राजनाथ सिंह यांना उद्देशून बोलताच लोकसभा अध्यक्षांनी त्यांना रोखलं. याबाबत सल्लागार समितीची बैठक होणार आहे, आता चर्चा नाही. यानंतर त्यांनी पुढच्या सदस्याला बोलण्यास सांगितलं. यानंतरही अधीर रंजन चौधरी यांनी पुन्हा वृत्तपत्रातील वृत्ताचा अहवालाचा उल्लेख केला. मात्र "संवेदनशील मुद्द्यावर संवेदनशील पद्धतीने आपलं मत मांडायला हवं," असं लोकसभा अध्यक्षांनी सांगितलं.
भारतीय सैन्याचं प्रत्युत्तर भारत आणि चीन यांच्यातील सीमेवरील तणाव शिगेला पोहोचला आहे. पूर्व लडाखमध्ये पँगाँग लेकजवळ भारतीय सैन्याने चीनला दिलेल्या प्रत्युत्तराची चर्चा आता चीनच्या सोशल मीडियावर होत आहे. चीनच्या सोशल मीडियामधील चर्चांनुसार डोंगराळ भागात युद्ध लढण्याची भारतीय सैन्याची क्षमता पुन्हा एकदा समोर आली आहे. चीनच्या गाओफेन-2 सॅटलाईटमधून समोर आलं आहे की, भारतीय सैन्य आता महत्त्वाच्या अशा ब्लॅक टॉपपासून केवळ दीड किमी अंतरावर आहे.
संपूर्ण देश भारतीय सैन्याच्या पाठिशी : पंतप्रधान दरम्यान लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी मीडिया संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "संपूर्ण देश भारतीय सैन्याच्या पाठिशी आहे, असा संदेश सभागृह आणि सभागृहातील सर्व सदस्य देतील. आज आपले वीर जवान मातृभूमीच्या रक्षणासाठी सीमेवर तळ ठोकून आहेत. हे सभागृह, सभागृहाचे सर्व सदस्य एका सुरात, एका भावनेने एक संदेश देतील की संपूर्ण देश सैन्याच्या पाठिशी आहे."