India Attack On Lahor : भारतीय लष्कराचा थेट लाहोरवर ड्रोन हल्ला; पाकिस्तानच्या आगळीकतेला भारताचा करारी जवाब
Operation Sindoor Update : आधीच लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टिम भारताने निकामी केली आहे. आता पाकिस्तानला उत्तर देत लाहोरवर ड्रोन हल्ला सुरू केला आहे.

मुंबई : पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याच्या आगळीतकेनंतर आता भारतानेही त्याला जशास तसं उत्तर दिलं आहे. भारताने पाकिस्तानच्या लाहोरवर ड्रोन हल्ला (India Drone Attack On Lahor) केला आहे. आधी जम्मू आणि इतर भागावर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला निकामी केल्यानंतर भारतीय सैन्याने आता पाकिस्तानवर हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, दोन्ही देशांनी शांतता राखावी, संयम राखावा असं आवाहन अमेरिकेने दोन्ही देशांना केलं आहे.
पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली आहे. तसेच बदल्यात भारताने काय पाऊल उचलले त्याचीही माहिती देण्यात आली आहे. भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे या सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत.
पाकिस्तानचे आठ ड्रोन पाडले
पाकिस्तानने भारताच्या दिशेने 8 ड्रोन सोडले होती. पाकची ड्रोन भारतीय लष्कराने हाणून पाडली. सतवारी, सांबा, आरएस पुरा, अरनियामध्ये पाकचे ड्रोन पाडण्यात आले. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने पाकला चांगलाच दणका दिला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चीफ डिफेंस स्टाफ यांनी संवाद साधला असून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तिन्ही सेनाप्रमुखांच्या संपर्कात असल्याचं समजतंय.
अमेरिकेची मध्यस्ती करण्याची तयारी
भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी यूएस सेक्रेटरी मार्को रुबियो यांच्याशी संवाद साधला. परिस्थिती चिघळू देऊ नका असं आवाहन अमेरिकेने केले. तसेच भारत-पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्याची तयारी अमेरिकेने दर्शवली आहे.
पाकिस्तानची दोन JF 17 विमाने पाडली
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला मोठा दणका दिलाय. भारताने पाकिस्तानचे दोन चिनी JF 17 लढाऊ विमानं पाडली आहेत. खुद्द पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यानेच याबाबत कबुली दिली. सतवारी, सांबा, आरएस पुरामध्ये पाकचा मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान पाकिस्तानचे सगळे हल्ले भारताने परतवून लावलेत.























