Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting : निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात 16.63 कोटीहून अधिक मतदार आहेत. यामध्ये 8.4 कोटी पुरुष आणि 8.23 कोटी महिला मतदार आहेत.
Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting) देशात पहिला टप्पा पार पडला. या टप्प्यात 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांवर मतदान झाले. पहिल्या टप्प्यात 1600 हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. या टप्प्यात नऊ केंद्रीय मंत्री, दोन माजी मुख्यमंत्री आणि एका माजी राज्यपालांचे भवितव्य पणाला लागले आहे. सकाळी 7 वाजता सुरू झालेले मतदान सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू होते. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभेच्या 92 जागांवरही आज मतदान झाले. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील एकूण पाच मतदारसंघात सायंकाळी पाचपर्यंत 54.85 मतदान झाले आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात 16.63 कोटीहून अधिक मतदार आहेत. यामध्ये 8.4 कोटी पुरुष आणि 8.23 कोटी महिला मतदार आहेत. त्यापैकी 35.67 लाख मतदार असे आहेत जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. तर 20 ते 29 वयोगटातील मतदारांची संख्या 3.51 कोटी आहे. यासाठी 1.87 लाख मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.
मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सायंकाळी 5 वाजेपर्यंत पश्चिम बंगाल, त्रिपुरा ते मेघालयपर्यंत बंपर मतदान झाले. त्याचवेळी यूपी-बिहार आणि मध्य प्रदेशातील मतदारांमध्येही उत्साह दिसून आला. पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमधील 4, यूपीमधील 8 आणि बिहारमधील 4 जागांवर मतदान होत आहे. याशिवाय तामिळनाडू (39) आणि उत्तराखंड (5 जागा) च्या सर्व जागांवर मतदान होत आहे. आता बंपर मतदानाचा फायदा कोणाला होणार? हा प्रश्न आहे.
बंपर मतदानाचा फायदा कोणाला होतो?
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बंपर मतदानाचा फायदा कोणाला होणार? राजकीय जाणकारांच्या मते, सर्वसाधारणपणे जास्त मतदान किंवा मतदानाची टक्केवारी वाढणे हे सत्ताधारी पक्षाविरोधातील जनक्षोभ म्हणून पाहिले जाते. सध्याचे सरकार बदलण्यासाठी लोक जास्त मतदान करतात, असे मानले जाते. उच्च मतदान टक्केवारी हे सरकार बदलाचे समानार्थी मानले जाते. मात्र, गेल्या काही निवडणुकांमध्ये हा कल बदलला आहे.
2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, मतदानाची टक्केवारी जास्त असूनही एनडीए केंद्रात सत्तेवर परतली आहे. 2014 मध्ये 66.4 टक्क्यांच्या तुलनेत 2019 मध्ये 67.3 टक्के मतदान झाले. असे असतानाही केंद्रात भाजपची सत्ता आली. तथापि, जर आपण 2009 च्या मतदानाच्या टक्केवारीची तुलना केली तर 2014 मध्ये जास्त मतदान झाल्यामुळे सत्ता परिवर्तन झाले. 2009 मध्ये 58.2% च्या तुलनेत 2014 मध्ये 66.4% मते पडली.
कोणत्या राज्यात किती मतदान?
- अंदमान आणि निकोबार: 56.87%
- अरुणाचल प्रदेश: 63.26%
- आसाम: 70.77%
- बिहार: 46.32%
- छत्तीसगड: 63.41%
- जम्मू आणि काश्मीर: 65.08%
- लक्षद्वीप: 59.02%
- मध्य प्रदेश: 63.25%
- महाराष्ट्र: 54.85%
- मणिपूर: 67.46%
- मेघालय: 69.91%
- मिझोरम: 52.62%
- नागालँड: 55.75%
- पुद्दुचेरी: 72.84%
- राजस्थान:50.27%
- सिक्कीम: 67.58%
- तामिळनाडू: 62.02%
- त्रिपुरा: 76.10%
- उत्तर प्रदेश: 57.54%
- उत्तराखंड: 53.56%
- पश्चिम बंगाल: 77.57%
'भाजपचा पहिला दिवस, पहिला शो फ्लॉप', अखिलेश यादवांच हल्लाबोल
सपा प्रमुख अखिलेश यादव म्हणाले की, भाजपचा फर्स्ट डे, फर्स्ट शो फ्लॉप झाला आहे. आता जनतेला भाजपच्या लोकांचा अभिनय आवडत नाही, ना कथा, ना चपखल संवाद. भाजपची खिडकी रिकामी आहे. देशातील सजग जनतेचे नवे भविष्य निवडल्याबद्दल त्यांचे आगाऊ अभिनंदन आणि परंपरेला फाटा देत भारतीय आघाडीच्या उमेदवारांना उघडपणे पाठिंबा देणाऱ्या आणि मतदान करणाऱ्या सर्व समाजातील नव्या राजकीय जाणिवेला सलाम.