गोव्यात 15 दिवसांच्या बंदीनंतर मासळीची आयात सुरु
गोव्यात फॉर्मेलिन प्रकरणानंतर परराज्यातून आयात मासळीवरील बंदी पंधरा दिवसांनंतर उठवण्यात आली आहे.
पणजी : गोव्यात फॉर्मेलिन प्रकरणानंतर परराज्यातून आयात मासळीवरील बंदी पंधरा दिवसांनंतर उठवण्यात आली आहे. त्यामुळे गोव्यात परराज्यांमधून मासळीची आयात सुरू झाली आहे. अन्न व औषध प्रशासन खात्याच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने पत्रदेवी आणि पोळे सीमेवर मासळीची तपासणी केल्यानंतरच वाहने गोव्यात सोडण्यात आली.
गोव्यात येणाऱ्या मासळीमध्ये फॉर्मेलिन या घातक रसायनाचा वापर झालेला असू नये म्हणून काळजी घेतली जात आहे. त्यामुळेच सीमेवर मासळीचे नमूने घेऊन ते तपासले जात आहेत. यापूर्वी परराज्यांतून येणाऱ्या मासळीमध्ये फॉर्मेलिन असते अशी भीती लोकांमध्ये निर्माण झाल्यानंतर सरकारने मासळीची आयात 18 जुलैपासून थांबवली होती.
गोव्यात 1 जून ते 31 जुलैदरम्यान मासेमारी बंदी होती. तसेच फॉर्मेलिन प्रकरणामुळे लोकांनी मासे खाणे बंद केले होते. त्यामुळे बाजारपेठेवर परिणाम झाला होता. 1 ऑगस्टपासून जरी मासेमारी सुरू झाली तरी, अजुनही गोव्यातील ट्रॉलर्स समुद्रात गेलेले नाहीत.
पोळे सीमेवर 14 तर पत्रदेवी सीमेवर 3 मासळीवाहू ट्रकची तपासणी केल्यानंतरच त्यांना आत सोडण्यात आले. अन्न व औषध विभागाचे अधिकारी, पोलीस यंत्रणा आणि वाहतूक अधिकारी यांनी मासळीची तपासणी केली मात्र मासळीत फॉर्मेलिन आढळले नाही, असं सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे.