अयोध्येतील राम मंदिरांचं बांधकाम कुठपर्यंत? श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून फोटो आणि व्हिडीओ जारी
Ram Mandir : अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराचं किती बांधकाम पूर्ण झाले आहे? याचं उत्तर श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने प्रसिद्ध केलेल्या फोटोवरुन मिळत आहे.
Ram Mandir Construction : अयोध्येत (Ayodhya) उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराचं (Ram Mandir) किती बांधकाम पूर्ण झालं आहे? याचं उत्तर श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने प्रसिद्ध केलेल्या फोटोवरुन मिळत आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने हा फोटो जारी केला आहे. त्यात मंदिराचा पूर्ण आकार दिसत आहे. उंचावरुन काढलेल्या या फोटोमध्ये मंदिराच्या बाहेरील भिंती बांधण्यात आल्याचं दिसत आहे. तसंच तळमजल्याचा संपूर्ण आकारही स्पष्टपणे दिसून येत आहे.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन मंदिराच्या बांधकामाचे फोटो शेअर करत लिहिलं आहे की, "राम भक्तांनी शतकानुशतके केलेल्या अखंड संघर्षाचा परिणाम म्हणून आता भगवान श्री रामललाचे भव्यदिव्य मंदिर आकार घेताना दिसत आहे, जय श्री राम!" या फोटोंसह एक व्हिडीओही जारी करण्यात आला आहे, ज्यात तळमजल्याचे आतील बांधकाम दाखवलं आहे.
कोटि-कोटि रामभक्तों द्वारा शताब्दियों तक किए गए अनवरत संघर्ष की परिणति के रूप में भगवान श्री रामलला का दिव्य मंदिर अब आकार लेता दिख रहा है।
— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) April 22, 2023
जय श्री राम!
The hard work of millions of Shri Ram Bhakts is finally taking shape in the form of a Divya Janmabhumi Mandir.
Jai Shri Ram! pic.twitter.com/T1mPm4ZT6O
तळमजल्याचे काम सुरु
राम मंदिर ट्रस्ट वेळोवेळी फोटो शेअर करुन मंदिराच्या बांधकामाशी संबंधित माहिती लोकांना देत असतं. असंख्य लोकांची श्रद्धा असलेल्या रामललाच्या भव्य मंदिराचं बांधकाम लोकांना पाहता यावं हा यामागील उद्देश आहे. ट्विटरवर जारी केलेल्या या व्हिडीओमध्ये तळमजल्यावरील खांब आणि भिंती यामध्ये दिसत आहेत. सध्या तळमजल्यावरील छप्पर बांधलं जात आहे. मंदिराच्या ठिकाणी बांधकाम करणारे कामगार दिसत आहेत. तळमजल्यावरील खांबांवर बीम टाकण्याचे काम सुरु आहे.
यापूर्वीही फोटो प्रसिद्ध
याआधी 6 एप्रिल रोजी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने फोटो जारी केले होते. या फोटोंमध्ये प्रवेशद्वाराचा पूर्ण आकार दाखवण्यात आला होता. तसंच तळमजल्यावरील खांब दाखवण्यात आले. यासोबतच बीम टाकण्याचे काम सुरु झाल्याचंही यात दिसत होतं.
मंदिराचं बांधकाम कधी पूर्ण होणार?
डिसेंबर 2023 पर्यंत भगवान रामाचं गर्भगृह तयार होईल आणि जानेवारी 2024 नंतर म्हणजेच मकरसंक्रांतीनंतर गर्भगृह भक्तांसाठी खुलं केलं जाईल, असं सांगण्यात येत आहे. मात्र, मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर बांधकाम सुरु राहणार आहे. राम दरबार व्यतिरिक्त माता अन्नपूर्णा, भगवान शंकर, बजरंगबलीसह अनेक मंदिरं इथे बांधली जाणार आहेत.