High Inflation Rate: आठ वर्षात महागाईत भरमसाठ वाढ; भाजीपाला, डाळी, वीज सर्वच महागलं
India High Inflation Rate: गेल्या दोन वर्षांपासून देशात कोविड महामारीमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांसाठी आणखी एक वाईट बातमी आहे.
India High Inflation Rate: गेल्या दोन वर्षांपासून देशात कोविड महामारीमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. महागाई कमी होईल या आशेवर असलेल्या सर्वसामान्य जनतेच्या पारड्यात पुन्हा एकदा निराशा पडली आहे. एप्रिलमध्ये महागाई दरात पुन्हा वाढ नोंदवण्यात आली आहे. एनएसओने एप्रिलमधील ग्राहक किंमत निर्देशांक जाहीर केला आहे. ज्यात महागाईने गेल्या आठ वर्षांतील सर्वोच्च पातळी गाठली असल्याचे सांगण्यात आले आहे. एप्रिलमध्ये महागाई 7.79 टक्क्यांवर पोहोचली होती. या वर्षी मार्चमध्ये महागाईचा दर 6.95 टक्के होता, तर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये हा दर 4.23 टक्के होता.
किती टक्के वाढला महागाईचा दर
केंद्र सरकारसाठी सर्वात चिंतेची बाब म्हणजे या वर्षी एप्रिलमध्ये अन्नधान्य महागाईचा दरही वाढला आहे. अन्नधान्य महागाई मार्चमधील 7.68 टक्क्यांवरून 8.38 टक्क्यांवर पोहोचली आहे. भाजीपाल्याच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. मार्चमध्ये भाज्यांची महागाई 11.64 टक्के असताना एप्रिलमध्ये ती 15.41 टक्क्यांवर पोहोचली.
फेब्रुवारीमध्ये किती होते औद्योगिक उत्पादन
देशात अन्नधान्य सोबतच इंधन-वीज महागाई 7.52% वरून 10.80%, डाळी 2.57% वरून 1.86%, कापड-शू 9.40% वरून 9.85% आणि गृहनिर्माण महागाई 3.38% वरून 3.47% पर्यंत वाढली आहे. मात्र यंदाच्या मार्च महिन्यात औद्योगिक उत्पादन दरात 1.9 टक्के वाढ नोंदवण्यात आली, ही सरकारसाठी दिलासादायक बाब आहे. फेब्रुवारीमध्ये औद्योगिक उत्पादनात 7.5 टक्के वाढ नोंदवण्यात आली.
दरम्यान, देशात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे जीवनावश्यक वस्तूच्या किंमतीत वाढ होत असल्याचे बोलले जात आहे. मुंबई पेट्रोल 120 रुपये प्रति लिटर इतके झाले आहे. देशाच्या वेगवेगळ्या राज्यात ही किंमत कमी जास्त प्रमाणात आहे, अशातच इंधन दरवाढ कधी आटोक्यात येईल असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Chhattisgarh Helicopter Crash: छत्तीसगडमध्ये विमानतळावर हेलिकॉप्टर कोसळले, दोन पायलटचा मृत्यू
Air India: एअर इंडियाचे भविष्य पालटणार; आता महाराजाची धुरा कॅम्पबेल विल्सन यांच्या हाती