(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chhattisgarh Helicopter Crash: छत्तीसगडमध्ये विमानतळावर हेलिकॉप्टर कोसळले, दोन पायलटचा मृत्यू
Helicopter Crash: छत्तीसगडमध्ये रायपूर विमानतळावर मोठी दुर्घटना घडली आहे. हेलिकॉप्टर लँडिंग दरम्यान क्रॅश झाले आहे.
Helicopter Crash: छत्तीसगडमध्ये रायपूर विमानतळावर मोठी दुर्घटना घडली आहे. हेलिकॉप्टर लँडिंग दरम्यान क्रॅश झाले आहे. यात विमानातील दोन पायलटचा मृत्यू झाला आहे. या मोठ्या अपघातानंतर विमानतळावर एकच गोंधळ उडाला आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. रायपूर पोलिसांनी अपघाताला दुजोरा दिला आहे. रायपूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात कॅप्टन गोपाल कृष्ण पांडा आणि कॅप्टन एपी श्रीवास्तव यांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 9.10 वाजता हा अपघात झाला आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ट्वीट करून शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिले आहे की, "रायपूर विमानतळावर हेलिकॉप्टरच्या अपघाताबाबत नुकतीच दुःखद माहिती मिळाली. देव त्यांच्या कुटुंबीयांना बळ देवो आणि दु:खाच्या प्रसंगी दिवंगत आत्म्याला शांती देवो.''
अभी रायपुर में एयरपोर्ट पर स्टेट हेलीकॉप्टर के क्रैश होने की दुखद सूचना मिली.
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) May 12, 2022
इस दुखद हादसे में हमारे दोनों पायलट कैप्टन पंडा और कैप्टन श्रीवास्तव का दुखद निधन हो गया है।
इस दुःख की घड़ी में ईश्वर उनके परिवारजनों को संबल एवं दिवंगत आत्मा को शांति प्रदान करे।
ॐ शांति:
हेलिकॉप्टर अपघाताबाबत राज्य सरकारकडून अधिकृत निवेदन आले आहे. यात सांगण्यात आले आहे की, राज्य सरकारचे एक हेलिकॉप्टर आज रात्री 9:10 वाजता लँडिंग दरम्यान क्रॅश झाले. विमानातील दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टर नेहमीच्या प्रशिक्षणाच्या उड्डाणावर होते, त्यानंतर ते क्रॅश झाले. प्रारंभी तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी डीजीसीए आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार सविस्तर तांत्रिक तपासणी केली जाईल. तसेच मृत वैमानिकाच्या कुटुंबीयांना तातडीने मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Air India: एअर इंडियाचे भविष्य पालटणार; आता महाराजाची धुरा कॅम्पबेल विल्सन यांच्या हाती