सावधान! देशातील अनेक शहरात उष्णतेच्या लाटेचा उद्रेक, कर्मचाऱ्यांसाठी कंपन्यांनी केल्या 'या' उपायोजना
गेल्या 10-12 दिवसांपासून कायम असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळं (Heatwave) लोकांचे हाल होत आहेत. यामुळं उष्णतेच्या लाटेचा सामना करत कार्यालयात जावे लागणाऱ्या लोकांना जास्त त्रास होत आहे.
Heatwave in India: देशातील वातावरणात मोठा बदल (Climate Change) झाला आहे. देशातील बहुतांश शहरात तापमानाचा (temperature) पारा चांगलाच वाढला आहे. अनेक ठिकाणी उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. गेल्या 10-12 दिवसांपासून कायम असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळं (Heatwave) लोकांचे हाल होत आहेत. यामुळं उष्णतेच्या लाटेचा सामना करत कार्यालयात जावे लागणाऱ्या लोकांना जास्त त्रास होत आहे. त्यामुळं कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना (Employee) काही सवलती देण्यास सुरुवात केली आहे.
दिल्लीत विक्रमी तापमानाची नोंद
उत्तर भारतात गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हाळा जाणवत आहे. देशातील अनेक शहरे उष्णतेच्या लाटेच्या तडाख्यात आहेत. तापमान वाढीचे सतत नवनवीन विक्रम होत आहेत. कालच दिल्लीत विक्रमी तापमानाची नोंद झालीय. काल दिल्लीतील तापमान 50 अंशांच्या पुढे गेले आहे. त्यामुळं नोकरदारांनाही अडचणींचा सामना करावा लागत असून, त्यांना दिवसा कार्यालयात जाणेही शक्य होत नाही. त्यामुळं कंपन्यांनी काही उपाययोजना देखील केल्या आहेत.
नेमक्या काय केल्या उपाययोजना?
दिल्ली-एनसीआरमधील विक्रमी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी मदतीचे उपाय केले आहेत. यासाठी अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची परवानगी दिली आहे. तर काही कंपन्यांनी त्यांच्या कामाचे वेळापत्रक बदलले आहे. त्याचवेळी, अनेक कंपन्यांनी त्यांच्या बाहेरून आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी दिल्ली-एनसीआरचा कामाचा प्रवास पुढे ढकलला आहे.
कोणत्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिला दिलासा?
कर्मचाऱ्यांना दिलासा देण्या कंपन्यांमध्ये अनेक कंपन्या आहेत. यामध्ये एमजी मोटर इंडिया, टाटा स्टील, एमवे, केपीएमजी, आयटीसी, आरपीजी ग्रुप, अपग्रेड, टीमलीज, एक्सफेनो, सीआयईएल इत्यादींचा समावेश आहे. आयटीसी आणि टाटा स्टील सारख्या कंपन्यांनी विशेष मोहिमा सुरू केल्या आहेत. ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना उष्णतेच्या लाटेबद्दल सतर्क राहण्यास आणि त्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजनांबद्दल सांगण्यात येत आहे. यामुळं कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
सोयीनुसार कामाचं वेळापत्रक
मिळालेल्या माहितीनुसार, एमजी मोटरने आपल्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानगी दिली आहे. तीव्र हवामान आणि प्रदूषण पाहता त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचा सल्ला दिलाय. RPG ग्रुपने कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची किंवा कामानुसार वेळापत्रक बदलण्याची सुविधाही दिली आहे. KPMG आपल्या कर्मचाऱ्यांना लवचिक कामाची सुविधा देखील देत आहे. Amway चे कर्मचारी त्यांच्या सोयीनुसार ठरवू शकतात की त्यांना कोणत्या दिवशी ऑफिसला जायचे आहे आणि कधी घरून काम करायचे आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये उष्णतेची लाट
गेल्या काही दिवसापासून देशातील अनेक शहरात तापमानात मोठी वाढ झालीय. उष्णतेची लाट म्हणजे उन्हाळ्याच्या हंगामात, जेव्हा तापमान सामान्यपेक्षा 5-10 अंश जास्त असते. उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक शहरे गेल्या दहा ते बारा दिवसांपासून अशा परिस्थितीचा सामना करत आहेत. प्रमुख महानगरांपैकी दिल्ली-एनसीआरमध्ये उष्णतेची लाट सर्वाधिक आहे.
महत्वाच्या बातम्या:
पुढील 36 तासांसाठी मुंबई, ठाणे, पालघरला उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट, काही भागात पावसाची शक्यता