(Source: ECI/ABP News/ABP Majha)
HDFC Bank: तारीख ठरली! एचडीएफसी आणि HDFC बँकेचं होणार विलीनीकरण, ठेवीदार आणि कर्जदारांवर काय परिणाम होणार?
HDFC-HDFC Bank Merger News: एचडीएफसी बँक आणि एचडीएफसीचे 1 जुलैपासून विलिनीकरण होणार आहे. विलिनीकरणासाठी लागणारी सर्व मंजुरी प्रक्रिया झाल्याची माहिती एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी दिली आहे.
HDFC Bank-HDFC Merger Impact: जर तुमचेही एचडीएफसी बँकेत खाते असेल तर ही बातमी जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. देशातील सर्वात मोठी हाऊसिंग कंपनी एचडीएफसी (HDFC) आणि एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. एचडीएफसी बँक आणि एचडीएफसीचे 1 जुलैपासून विलिनीकरण होणार आहे, अशी माहिती एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी दिली. या विलिनीकरणानंतर एचडीएफसी फायनान्स एचडीएफसी बँकेचा एक भाग बनेल. विलिनीकरणासाठी लागणारी सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असून 30 जून रोजी बाजार बंद झाल्यानंतर एचडीएफसी बोर्डाची या प्रक्रियेसाठीची अखेरची बैठक पार पडणार आहे.
एचडीएफसी कंपनी 13 जुलैपासून ‘एचडीएफसी बँक' नावाने आपले शेअर ट्रेड करणार असल्याची माहिती देखील एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी दिली. एचडीएफसी बँकेने गेल्या वर्षी 4 एप्रिल रोजी एचडीएफसीचे अधिग्रहण करण्याचे मान्य केले होते. लवकरच होणाऱ्या प्रस्तावित संस्थेची एकत्रित मालमत्ता सुमारे 18 लाख कोटी रुपयांची असेल. एचडीएफसी बँक आणि एचडीएसएफ लिमिटेड यांच्या विलिनीकरणानंतर एचडीएफसी बँक ही जगातील पाचवी सर्वात मोठी बँक बनेल. एप्रिल 2023 पर्यंत HDFC बँक जगातील मार्केट कॅपमध्ये अकराव्या क्रमांकावर होती.
एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या मर्जरसंदर्भात मागच्या वर्षी केलेल्या घोषणेनंतर अध्यक्ष दीपक पारेख यांनी मंगळवारी विलिनीकरणाची तारीख उघड केली आहे. विलीनीकरण होणार असले तरी एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या ठेवीदारांना पूर्वीप्रमाणेच व्याज मिळणार आहे. परंतु, विलिनीकरणानंतर ठेवीदार किंवा कर्जदारांना एचडीएफसी बँकेने ठरवलेल्या व्याजावर परतावा किंवा कर्ज मिळणार आहे.
शेअरहोल्डर्सना मिळणार संपूर्ण हिस्सा
एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) गेल्या वर्षी HDFC लिमिटेड ताब्यात घेण्यास आपली सहमती दर्शवली होती. हा करार 40 अब्ज डॉलर्सचा असून याची प्रस्तावित एकत्रित मालमत्ता सुमारे 18 लाख कोटी रुपयांची असेल. यानंतर, एचडीएफसी बँकेचे भागधारक बँकेतील 41 टक्के समभाग धारण करतील. HDFC लिमिटेडच्या प्रत्येक भागधारकाला त्याच्याकडे असलेल्या प्रत्येक 25 समभागांमागे HDFC बँकेचे 42 शेअर्स मिळणार आहेत.
HDFC Ltd शेअर ट्रेडिंग कधी थांबणार?
एचडीएफसी-एचडीएफसी बँकेच्या विलिनीकरणानंतर 13 जुलैपासून एचडीएफसी लिमिटेडच्या शेअर्समधील व्यवहार थांबणार आहेत. HDFC बँकेच्या सर्व शाखा तारण कर्ज देऊ शकतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एप्रिलमध्ये HDFC बँकेला निवडक सवलती दिल्या होत्या. हे विलीनीकरण भारताच्या इतिहासातील सर्वात मोठं विलिनीकरण असणार आहे. समूह विमा आणि मालमत्ता व्यवस्थापन व्यवसायांव्यतिरिक्त लाखो ग्राहक आणि दोन्ही कंपन्यांचे भागधारक या विलिनीकरणामुळे एकत्रित येणार आहेत.
हेही वाचा: