भारत चीनची 'व्यापारी वसाहत' होतेय का? द्वीपक्षीय व्यापार 100 अब्ज डॉलर्सवर, भारताची चीनकडून आयात निर्यातीच्या चारपट अधिक
भारत आणि चीनमधील द्वीपक्षीय व्यापाराची 2014-15 आणि 2019-20 सालची आकडेवारी असं सांगते की भारताने चीनला केलेल्या निर्यातीपेक्षा चारपट अधिक आयात केली आहे.
नवी दिल्ली : भारत चीनमधील द्वीपक्षीय व्यापार विक्रमी 100 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. अनेकांना हा आकडा मोठा वाटेल पण हा व्यापार अत्यंत असमतोल आहे असं आकडेवारीवरुन दिसतंय. 2019-20 चा विचार करता या 100 अब्ज डॉलर्सपैकी भारताने चीनकडून तब्बल 65.2 अब्ज डॉलर्सची आयात केली आहे. तर या काळातील भारताची चीनला निर्यात ही केवळ 16.6 अब्ज डॉलर्स इतकी आहे. या दोन देशांमधील व्यापार हा चीनच्या बाजूने मोठ्या प्रमाणात झुकला असून भारत आता चीनची व्यापारी वसाहत बनतोय की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या वर्षी या दोन्ही देशात सीमेवर मोठ्या प्रमाणात तणाव वाढला. त्यावर भारतीयांनी चीनी मालावर बहिष्कार टाकण्याची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली. याला केंद्र सरकारकडून अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचंही सांगण्यात येत होतं. गणपती, दिवाळी आणि इतर सणांच्या काळातही चीन वस्तू खरेदी न करण्याचं आवाहन अनेक संघटनांच्या वतीनं करण्यात आलं होतं. पण सध्याची आकडेवारी पाहता याचा काही फायदा झालाय असं वाटत नाही. सीमेवर तणाव असतानाही दोन्ही देशातील व्यापारही या वर्षीच्या पहिल्या 11 महिन्यात 46 टक्क्यांनी वाढला.
चीनची निर्यात भारताच्या चार पटीने जास्त
भारतातून चीनमध्ये साधारण २ लाख कोटी रुपयांची निर्यात झाली. तर भारताने चीनकडून ६ लाख ६० हजार कोटी रुपयांची आयात केली आहे. गेल्या सहा वर्षातील चीनकडून करण्यात आलेली आयात ही वाढली आहे. 2014-15 साली भारताने चीनला 11.9 अब्ज डॉलर्सची निर्यात केली होती तर त्याच वर्षी भारताने चीनकडून 60.4 अब्ज डॉलर्सची आयात केली होती. ही आयात चीनला केलेल्या निर्यातीपेक्षा तब्बल सहापटीन जास्त होती.
सन 2019-20 या साली भारताने चीनला 16.6 अब्ज डॉलर्सची निर्यात केली आहे. त्याच वर्षी भारताने चीनकडून 65.3 अब्ज डॉलर्सची आयात केली आहे.
भारताकडून चीनला निर्यात करण्यात येणाऱ्या वस्तूंच्या यादीत मत्स्य आणि सी फूड्स, ग्रेनाईट, लोह, पेट्रोलियम आणि मिनरल ऑईलचा क्रमांक वरती लागतो. तर आयातीच्या यादीत प्रोजेक्ट गुड्स, व्हिडीओ मॉनिटर्स, ऑटोमोबाईलचे पार्ट्स आणि अॅन्टिबायोटिक्सचा क्रंमाक वरती लागतो.
महत्त्वाच्या बातम्या :