Pahalgam Attack: महिलांमध्ये योद्ध्याची भावना..., पहलगामात 'सिंदूर' गमावणाऱ्यांबद्दल भाजप खासदार रामचंद्र जांगडांचं वादग्रस्त विधान; नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता
Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर हरियाणा भाजपचे राज्यसभा खासदार रामचंद्र जांगडा यांनी वादग्रस्त विधान केले आहे. जांगडांनी महिलांनी दहशतवाद्यांशी लढायला हवे होते, त्यामुळे कमी लोकांचा मृत्यू झाला असता, असंही म्हटलं आहे.

Pahalgam Attack: हरियाणाचे भाजपचे राज्यसभा खासदार रामचंद्र जांगरा यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पहलगाममध्ये महिलांनी दहशतवाद्यांशी सामना करायला हवा होता. पण त्यांच्यात वीरांगनासारखा भाव नव्हता. जर महिलांनी हात जोडण्याऐवजी त्या लढल्या असत्या तर कमी लोक मारले गेले असते. अहिल्याबाई होळकर आणि झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्यासारखे शौर्य दाखवण्याचे आवाहन जांगडा यांनी महिलांना केले. त्यांच्या या विधानामुळे आता वाद निर्माण झाला आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त भिवानी येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान हे विधान करण्यात आले. यावेळी आमदार कपूर बाल्मिकी, आमदार घनश्याम सराफ आणि जिल्हाप्रमुख वीरेंद्र कौशिक यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार रामचंद्र जांगडा यांना कार्यक्रमादरम्यान पहलगाम हल्ल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. महिलांनी दहशतवाद्यांशी लढायला हवे होते का, यावर उत्तर देताना ते म्हणाले, "अगदीच लढायला हवे होते. जर महिला हात जोडण्याऐवजी लढल्या असत्या, तर दहशतवादी मारले गेले असते. पर्यटकांचे कमी मृत्यू झाले असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'अग्निवीर योजना' याचसाठी सुरू केली आहे, असेही ते पुढे म्हणालेत. जर तेथे पोहोचलेला प्रत्येक पर्यटक अग्निवीर असता, तर त्यांनी दहशतवाद्यांनाच घेरलं असतं. एकही दहशतवादी परत गेला नसता, असंही जांगडा यांनी म्हटलं आहे. पहलगाम हल्ल्यातील आरोपी दहशतवादी अद्याप पकडले गेलेले नाहीत. पण सैन्याने दहशतवाद्यांचे तळ आणि त्यांचे म्होरके संपवले आहेत, असल्याचं वक्तव्य जांगडा यांनी केलं आहे.
काय म्हणाले रामचंद्र जांगडा ?
रामचंद्र जांगडा यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात अहिल्याबाई होळकर आणि झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्यासारखे शौर्य दाखवण्याचे आवाहन जांगडा यांनी महिलांना केले. जर महिलांनी हात जोडण्याऐवजी त्या लढल्या असत्या तर कमी लोक मारले गेले असते. चर्चासत्रानंतर, रामचंद्र जांगडा यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील आरोपींची ओळख आणि अटक या प्रश्नाला टाळले. ते म्हणाले की, जरी आरोपी पकडले गेले नसले तरी आमच्या सैन्याने त्यांचे लपण्याचे ठिकाण आणि म्होरके यांना उद्ध्वस्त केले आहे.
दीपेंद्र हुड्डांचा रामचंद्र जांगडा यांच्यावर हल्लाबोल
काँग्रेसचे लोकसभा खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी रामचंद्र जांगडा यांच्या विधानावर तीव्र टीका केली आहे. दीपेंद्रने सोशल मिडिया एक्सवर वर लिहिले, पहलगाममधील हल्ल्यात दहशतवाद्यांनी ज्यांचं कुंकू पुसलं, आता त्यांची मर्यादा उद्ध्वस्त करण्याचं काम हरियाणाचे भाजपचे खासदार रामचंद्र जांगडा करत आहेत. हे अत्यंत घृणास्पद विधान आहे. भाजपकडून शहीद जवानांच्या कुटुंबाचा सतत अपमान होत आहे. यावर आळा घातला गेला पाहिजे." रामचंद्र जांगडा यांच्या विधानावर अनेक स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. त्यांच्या विधानामुळे महिलांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, अशी टीका होत आहे. तर, काहींनी त्यांच्या विधानाचे समर्थन केले आहे.























