(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर, अशोक चव्हाणांसह महाराष्ट्रातील चौघांचा समावेश
Gujarat Assembly Election 2022 : स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये काँग्रेस अध्यक्ष व गांधी कुटुंबासह देशभरातील प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार नेत्यांचा समावेश आहे.
Congress Star Campaigners In Gujarat : गुजरात विधानसभा निवडणूक 2022 साठी काँग्रेसनं स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पक्षाच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या नावाचा समावेश आहे. काँग्रेसकडून 40 स्टार प्रचाराकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहे. स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये काँग्रेस अध्यक्ष व गांधी कुटुंबासह देशभरातील प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार नेत्यांचा समावेश आहे. (Maharshtra Congress Leader)
एकूण 40 प्रचारकांच्या या यादीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग व कमलनाथ, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंग हुड्डा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा प्रामुख्याने समावेश आहे. महाराष्ट्रातून चव्हाण यांच्या व्यतिरिक्त माजी मंत्री शिवाजीराव मोघे, नसीम खान व रामकिशन ओझा यांचा या यादीत समावेश आहे.
182 सदस्यीय गुजरात विधानसभेसाठी येत्या एक आणि पाच डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार असून, मतमोजणी आठ डिसेंबरला होईल. या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत रमेश चेन्नीथला, तारिक अन्वर, बी.के. हरिप्रसाद, मोहन प्रकाश, शक्तिसिंग गोहिल, डॉ. रघू शर्मा, जगदीश ठाकोर, सुखराम राठवा, सचिन पायलट, भरतसिंग सोलंकी, अर्जुन मोडवाडिया, सिद्धार्थ पटेल, अमित चावडा, नरेनभाई राठवा, जिग्नेश मेवानी, इम्रान प्रतापगढी, कन्हैय्या कुमार, कांतिलाल भुरिया, राजेश लिलोथिया, परेश धनानी, विरेंदरसिंग राठोड, उषा नायडू, बी.एम. संदीप, अनंत पटेल, अमरिंदरसिंग राजा व इंद्रविजयसिंग गोहिल यांचाही समावेश आहे.
भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये कोण कोण?
तीन दिवसांपूर्वी भाजपनेही आपल्या 40 स्टार प्रचाराकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. 40 स्टार प्रचारकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, स्मृती इरानी, शिवराज सिंह, रवी किशन, मनोज तिवारी, हेमा मालिनी, परेश रावल, विजय रुपाणी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा समावेश आहे. या नेत्यांशिवाय भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांचाही या यादीत समावेश आहे. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या नावाचा समावेश आहे. त्याशिवाय गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि माजी उपमुख्यमंत्री नितीन पेटल यांच्या नावाचाही समावेश आहे. या दोन्ही नेत्यांनी गुजरात निवडणूक लढण्यास नकार दिला होता. कलाकारांमध्ये अभिनेता परेश रावल याच्याशिवाय भोजपुरी गायक आणि खासदार मनोज तिवारी, अभिनेता रवी किशन आणि गायक दिनेश लाल यादव 'निरहुआ' यांच्या नावाचाही समावेश आहे.