Gujarat Air India Plane Crash: अरे तू कटऑफ का केलं?...; अपघातापूर्वी पायलट्समध्ये काय संभाषण झालं?, धक्कादायक माहिती समोर
Gujarat Air India Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला होता. यात विमानातील 241 प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या 24 जणांचा मृत्यू झाला होता.

Gujarat Air India Plane Crash: गुजरातमधील अहमदाबादमध्ये 12 जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताचा (Gujarat Air India Plane Crash) प्राथमिक अहवाल समोर आला आहे. एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) च्या अहवालात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. विमान टेकऑफ केल्यानंतर काही सेकंदातच कोसळले. याचे एक महत्त्वाचे कारण दोन्ही इंजिन बंद पडणे होते. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे विमानाने आवश्यक उंची गाठली होती, परंतु त्यानंतर दोन्ही इंजिने 'रन' मोडवरून 'कटऑफ' मोडवर गेली. AAIB च्या अहवालात पायलटच्या संभाषणाचाही उल्लेख आहे.
अपघातापूर्वी पायलट्समध्ये काय संभाषण झालं?
कॉकपिटच्या व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये अपघाताच्या काही क्षणांपूर्वी एक पायलट दुसऱ्याला विचारतो, तु इंजिन कटऑफ का केलंस?, त्यावर मी काहीही केलं नाहीय, असं दुसरा पायलट उत्तर देतो. दोन्ही पायलट्समधील हे संभाषणाचा उल्लेख प्राथमिक चौकशीच्या अहवालामध्ये करण्यात आला आहे.
काही क्षणातच इंजिनामधील थ्रस्ट संपुष्टात आलं- (Why Gujarat Air India Plane Crash)
एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अहमदाबाद येथील विमानतळावरून उड्डाण केल्यावर विमानाच्या इंजिनांना होणाऱ्या इंधनाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारे स्विच बंद केले गेले होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच इंजिनामधील थ्रस्ट संपुष्टात आलं आणि विमान खाली कोसळल्याचं समोर आलं आहे.
विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू-
अहमदाबाद विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला होता. यात विमानातील 241 प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या 24 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये राज्यातील 9 जणांचा समावेश आहे. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनकडे उड्डाण केल्यावर अवघ्या 12 ते 15 सेकंदात हा भीषण अपघात झाला.
डीजीसीएने एअर इंडियाच्या 3 अधिकाऱ्यांना काढले-
21 जून रोजी डीजीसीएने एअर इंडियाला 3 अधिकाऱ्यांना काढून टाकण्याचे आदेश दिले. यामध्ये विभागीय उपाध्यक्ष चुडा सिंग, क्रू शेड्युलिंग करणारी मुख्य व्यवस्थापक पिंकी मित्तल आणि क्रू शेड्युलिंगच्या नियोजनात सहभागी असलेली पायल अरोरा यांचा समावेश होता. विमान सुरक्षा प्रोटोकॉलचे गंभीर उल्लंघन केल्याबद्दल तिन्ही अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली. डीजीसीएने एअर इंडियाला क्रू शेड्युलिंग आणि रोस्टरिंगशी संबंधित भूमिकांमधून तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले होते.

























