न्यायपालिकेचा अधिकार बळकावू नये, सुपरकॉप ज्युलिओ रिबेरो यांचं पोलीस अधिकाऱ्यांना खुलं पत्र
कायदा आणि सुव्यवस्था कायम राहण्यासाठी ज्युलिओ रिबेरो यांनी कुख्यात गुंड विकास दुबे प्रकरणासह अनेक प्रकरणांचा उल्लेख या पत्रात केला आहे. त्यामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकरणात तपास अधिकाऱ्यांना खटला चालवण्याचा आणि त्यावर न्यायनिवाडा करण्याता अधिकार नसल्याचं सांगत.
नवी दिल्ली : कानपूरमध्ये 8 पोलिसांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड विकास दुबेचा एन्काऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला. पोलीस चकमकीत गुंड विकास दुबे आणि त्याच्या पाच साथीदारांचा मृत्यू झाला होता. यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. तसेच याप्रकरणी निवृत्त पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी खुल्या पत्राद्वारे पोलीस अधिकाऱ्यांना आवाहन केलं आहे.
कायदा आणि सुव्यवस्था कायम राहण्यासाठी ज्युलिओ रिबेरो यांनी कुख्यात गुंड विकास दुबे प्रकरणासह अनेक प्रकरणांचा उल्लेख या पत्रात केला आहे. त्यामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकरणात तपास अधिकाऱ्यांना खटला चालवण्याचा आणि त्यावर न्यायनिवाडा करण्याता अधिकार नसल्याचं सांगत. विकास दुबे प्रकरणाप्रमाणे न्यायपालिकेचा अधिकार बळकावू नये, असे आवाहन केलं आहे.
निवृत्त पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, 'गुन्हे आणि गुन्हेगार यांना हाताळताना दहशतवादाविरुद्ध वापरल्या जाणाऱ्या जुन्या पद्धती सध्याच्या काळात जशाच्या तशा वापरल्या जाऊ शकत नाहीत. पोलीस अधिकाऱ्यांना आणि आपल्या राजकीय गुरूंना लाच देऊन गुन्हेगार आणि मोठ्या गुन्हेगारी टोळ्या अस्तित्वात येतात. गुन्हा करणारे गुन्हेगार, पोलीस आणि राजकीय नेते यांच्या संबंधांतूनच 'भस्मासूर' जन्म घेतात. तुम्हा सर्वांना आणि सामान्य पोलिसांनाही याची कल्पना आहे.
आपल्या पत्रातून ज्युलिओ रिबेरो पुढे म्हणाले की, 'राजकीय नेत्यांना जागं करण्यासाठी तुम्ही फारसं काही करू शकत नाही. मात्र, गुन्हेगारांना पाठिंबा देण्यापासून तुम्ही आपल्या सहकाऱ्यांना नक्कीच परावृत्त करू शकता. असं केल्याने तुम्ही या गुन्हेगारी साखळीच्या तीन पायांपैकी एक पाय नक्कीच कमकुवत करू शकता. तसेच, प्रामाणिकपणा, सत्य व न्यायासाठीची तळमळ, कायदा आणि संविधानाप्रति बांधिलकी ही तत्त्वे चिरस्थायी आहेत. खोट्या चकमकी आणि चौकशीच्या पाशवी पद्धती बंद होतील असं धोरण तुम्ही तयार कराल, याची मला खात्री आहे, असंही रिबेरो आपल्या पत्रात म्हणाले आहेत.
दरम्यान, कानपूरमध्ये 8 पोलिसांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड विकास दुबेचा एन्काऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला. विकास दुबे याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सच्या पथकाने कानपूर येथे आणले होते. परंतु पोलिसांची गाडी पलटी झाली. तिथून विकास दुबेनं पोलिसांची बंदूक हिसकावत पळून जाण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान झालेल्या चकमकीत तो ठार झाला.
विकास दुबेला अटक केल्यापासून ते मृत्यूपर्यंत 24 तासांत नेमकं काय घडलं?
गुरुवारी, 9 जुलै रोजी सकाळी 9.30 च्या सुमारास विकास दुबे याला उज्जैन येथील महाकाळ मंदिरात आत्मसमर्पण केले.
मिळालेल्या माहितीनुसार, विकासने मंदिराच्या रक्षकांना आपले नाव सांगितले, त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि त्याला अटक करण्यात आली.
यानंतर उज्जैन पोलिसांनी सुमारे 8 तास त्याची चौकशी केली. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने पोलिसांचे मृतदेह जाळण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते.
दरम्यान, कानपूरमध्ये यूपी पोलिसांनी विकास दुबेची पत्नी ऋचा आणि तिच्या अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले. पोलिसांनी ऋचाला विचारपूस केली.
उज्जैनमध्ये विकास दुबेच्या प्रकरणाची नोंद न असल्याने आणि कानपूर एसएसपीच्या विनंतीवरून त्याला संध्याकाळीच तिथे पोहोचलेल्या यूपी पोलिसांच्या एसटीएफच्या पथकाकडे सोपविण्यात आले.
यानंतर एसटीएफची टीम मोठा ताफा घेऊन उज्जैन ते कानपूरकडे रस्ता मार्गे रवाना झाली.
मध्यप्रदेशच्या भोपाल, गुना, झाशी आणि त्यानंतर उत्तरप्रदेश मधील रस्त्यांवर मोठा फौजफाटा होता.
ज्या गाडीत विकास दुबे होता त्या गाडीच्या 10-12 किमीच्या अंतरावर कोणत्याही वाहनाला येण्याची परवानगी नव्हती.
जवळपास 50 पेक्षा अधिक पोलिस विकास दुबेसोबत होते. एमपी ते यूपी या पूर्ण रस्त्यावर शेकडो पोलिस उपस्थित होते.
शुक्रवारी, 10 जुलै रोजी पहाटे साडेसहा वाजता विकास दुबे यांना घेऊन जाणारी एसटीएफची टीम कानपूर हद्दीत आली.
संध्याकाळी 6.25 च्या सुमारास विकास दुबेला घेऊन जाणारे एसटीएफचे वाहन रस्त्यावर पटली झाले.
यादरम्यान त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, सोबत पोलिसांची बंदूक ही हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.
यावेळी पोलिसांशी त्याची चकमक झाली. त्यात तो मारला गेला. या चकमकीत दोन पोलिसही जखमी झाले.
जखमी अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथं सकाळी 7.45 च्या सुमारास विकास दुबेला मृत घोषित करण्यात आलं.