Gandhi Jayanti 2022 : नथुराम गोडसेच्या जन्मवर्षीच गांधीजींना 'महात्मा' ही पदवी; जाणून घ्या सर्वप्रथम महात्मा हे संबोधन कुणी दिलं?
Mahatma Gandhi : गांधीजींच्या नावापुढे महात्मा ही पदवी लागली आहे ती त्यांच्या अतुलनीय कार्यामुळे. लोकमान्य टिळकही गांधीजींचा उल्लेख महात्मा असेच करायचे.
मुंबई: आज सर्व देशभर गांधीजींची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली गेली. महात्मा गांधींनी आपल्या विचाराने केवळ देशालाच नव्हे तर संपूर्ण जगावर एक वेगळीच छाप उमटवली. असं कोणतंही क्षेत्र नाही, अशी कोणतीही गोष्ट नाही ज्याला गांधीवादाने स्पर्श केला नाही. गांधीजींच्या जीवनातील अनेक घटना या रंजक आहेत. त्यांना आपण महात्मा म्हणतो, पण महात्मा ही पदवी त्यांना कशी मिळाली, महात्मा म्हणून पहिल्यांदा संबोधन कोण केलं याचीही कथा रंजक आहे. गांधीजींचे मित्र प्राणजीवन मेहता यांनी गोपाळ कृष्ण गोखले यांना लिहिलेल्या एका पत्रामध्ये गांधीजींचा उल्लेख महात्मा असा केला. ज्या वर्षी नथुराम गोडसेचा जन्म झाला, म्हणजे 1910 साली गांधीजींचा पहिल्यांदा उल्लेख महात्मा असा करण्यात आला हा एक विशेष योगायोग. ज्येष्ठ पत्रकार धवल कुलकर्णी यांच्या ट्वीटर थ्रेडमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
काठियावाडच्या कार्यक्रमात उल्लेख
गांधीजी 27 नोव्हेंबर 1915 रोजी आफ्रिकेतून भारतात परतले. त्यावेळी त्यांचं काठियावाड येथं मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी एक स्थानिक धर्मगुरू असलेल्या जीवराम कालिदास शास्त्री या व्यक्तीने पहिल्यांदा त्यांना महात्मा असं संबोधलं. हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम होता ज्यामध्ये गांधीजींचा उल्लेख महात्मा असा करण्यात आला.
Who conferred the honorific of #Mahatma on #MahatmaGandhi? In 1910, #Gandhiji's friend Pranjivan Mehta referred to him as one in a letter to Gopal Krishna Gokhale (#Gandhi's guru). Incidentally, #Gandhi's assassin #NathuramGodse was born in the same year (1910)!#GandhiJayanti
— Dhaval Kulkarni (धवल कुलकर्णी) 🇮🇳 (@dhavalkulkarni) October 2, 2022
टिळक त्यांना महात्मा म्हणायचे
महात्मा गांधी यांची विचारसरणी आणि लोकमान्य टिळकांची विचारसरणी ही वेगवेगळी असली तरी लोकमान्य टिळक गांधीजींचा उल्लेख हा महात्मा असाच करायचे. अवंतिका गोखले यांनी 1918 साली महात्मा गांधी यांचे चरित्र लिहिले. गांधीजींच्या जीवनावर आधारित असलेली ही पहिलीच बायोग्राफी होती. याची प्रस्तावना ही लोकमान्य टिळकांनी लिहिली होती. त्यामध्ये त्यांनी गांधीजींचा उल्लेख हा महात्मा असा केला होता.
अवंतिका गोखले आणि बबन गोखले हे गांधीजींच्या आंदोलनाशी जोडले गेलेले होते. त्यांच्यासोबत काकासाहेब केळकर आणि विनोबा भावे हे देखील होते. महात्मा गांधींच्या आंदोलनाशी महाराष्ट्रातून अनेक लोक जोडले गेले होते. महात्मा गांधी यांचे राजकीय गुरू, गोपाळ कृष्ण गोखले हे पुण्याचे. विनोबा भावे आणि अप्पासाहेब पटवर्धन, ज्यांना 'कोकण गांधी' असं म्हटलं जायचं ते देखील महाराष्ट्रातील. गांधीजींचे वैचारिक विरोधक असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर हे देखील याच राज्यातील. विशेष म्हणजे गांधीजींची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देखील महाराष्ट्रातीलच.
महत्त्वाच्या बातम्या :
Gandhi Jayanti 2022 : गांधीवादातून हे पाच धडे तुम्ही घेतलेच पाहिजेत, जाणून घ्या काय आहे
Mahatma Gandhi : ज्या वेळी मनात शंका येईल त्यावेळी 'त्या' दुर्बल व्यक्तीचा चेहरा आठवा..., महात्मा गांधीजींनी सांगितलेला मंत्र काय होता?