Petrol-Diesel Price आणखी एका राज्यात पेट्रोल 10 रुपयांनी आणि डिझेल 5 रुपयांनी स्वस्त
Petrol-Diesel Price भाजपशासित राज्यानंतर आता काँग्रेसशासित राज्यांनीदेखील पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. पंजाब सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात 10 आणि 5 रुपयांची कपात केली आहे.
Petrol-Diesel Price : इंधन दरवाढीने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने करात कपात करत पेट्रोल, डिझेलचे दर काही प्रमाणात कमी केले. केंद्राच्या या निर्णयानंतर काही राज्यांनी आपल्या करातही कपात करत इंधन दर आणखी कमी केले. गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आदी राज्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला होता. भाजपशासित राज्यानंतर आता काँग्रेसशासित पंजाबनेही इंधन दर कमी केले आहेत. पंजाबमध्ये पेट्रोल 10 रुपयांनी तर डिझेल 5 रुपयांनी स्वस्त करण्यात आले आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी याबाबतची माहिती दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून मध्यरात्रीपासून इंधन दर कमी होणार आहेत.
केंद्र सरकारने दिवाळीच्या एक दिवस आधीच म्हणजे तीन नोव्हेंबर रोजी पेट्रोल-डिझेलवर लावण्यात येणारे एक्साइज कर कमी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर भाजपशासित राज्यांनी राज्य सरकारच्या करात कपात करण्याची घोषणा केली. त्यानंतर काँग्रेसशासित, बिगरभाजप शासित राज्यांनी दर कमी करण्याचे आवाहन करण्यात येत होते. त्यानंतर पंजाब सरकारने इंधन दरात कपात केली.
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल दराच्या किंमतीच्या उत्पादन शुल्कात पाच आणि 10 रुपयांची कपात केली होती. सरकारच्या या निर्णयानंतर देशभरात पेट्रोलच्या दरात 5.7 रुपयांपासून 6.35 रुपयांपर्यंत आणि डिझेलच्या किंमतीत 11.16 रुपये ते 12.88 रुपयांपर्यंत कपात झाली होती.
रविवारी इंधन दर स्थिर
दरम्यान, भारतीय तेल कंपन्यांच्या वतीनं रविवारी सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहे. दिवाळीपूर्वी मोदी सरकारनं देशवासियांना 'दिवाळी गिफ्ट' देत पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केलं होतं. त्यानंतर अनेक राज्य सरकारांनी आपल्या वतीनं कर कमी करत जनतेला दिलासा दिला. महाराष्ट्रात मात्र राज्य सरकारनं करात कपात केली नाही, त्यामुळे विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणाही साधला आहे.
आज मुंबईत पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. तर देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत 103.97 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे.