Sunil Jakhar Joins BJP : पंजाब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील जाखड यांचा भाजपमध्ये प्रवेश
पंजाबचे ज्येष्ठ नेते सुनील जाखड ( Sunil Jakhar) यांनी अखेर आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थिती त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला.
Sunil Jakhar Joins BJP : काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणारे पंजाबचे ज्येष्ठ नेते सुनील जाखड ( Sunil Jakhar) यांनी अखेर आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थिती त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. नड्डा यांनी सुनील जाखड यांना पक्षाचे सदस्यत्व दिले. यावेळी जे पी नड्डा यांनी सुनिल जाखड यांचे भाजपमध्ये स्वागत केले. पंजाबमध्ये राष्ट्रवादी शक्ती मजबूत करणे ही काळाची गरज असल्याचे नड्डा म्हणाले.
पंजाब तोडण्यास विरोध - जाखड
कुटुंबाशी असलेले संबंध तोडून मी इथे आलो आहे. पंजाबला जाती-धर्माच्या नावावर तोडण्यास मी विरोध केला होता. मला वाटते की पंजाब हा एक प्रांत आहे. या प्रांताने देशासाठी मोठे योगदान दिले आहे. प्रत्येक बाबतीत पंजाबने आपले नाव कमावले असल्याचे जाखड म्हणाले.
Former Punjab Congress Chief Sunil Jakhar joins Bharatiya Janata Party in presence of party president JP Nadda in Delhi pic.twitter.com/eoUHhHH1Ul
— ANI (@ANI) May 19, 2022
जाखड यांनी भाजपमध्ये प्रवेश का केला
एक व्यक्ती बोलल्याने कोणी संबंध तोडू शकत नाही. मी कायम नातेसंबंध जपले आहेत. पण जेव्हा आपण आपल्या सिद्धांतापासून दूर जातो तेव्हा नवीन मार्गाने विचार करणे आवश्यक असते असे जाखड यावेळी म्हणाले. त्यामुळेच मी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. भाजपमध्ये येण्याबाबत ते म्हणाले की, सुनील जाखड यांचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही. पंजाबमध्ये मी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. करतारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन झाले, त्यावेळी पंतप्रधानांशी जवळून संवाद साधता आल्याचे त्यांनी सांगितले.
जाखड यांनी काही दिवसांपूर्वी अनुशासनहीनतेची नोटीस आल्यानंतर काँग्रेस सोडली होती. पक्ष सोडण्यापूर्वी त्यांनी काँग्रेसवर बरीच टीका केली होती. जाखड यांचे कुटुंब जवळपास 50 वर्षे काँग्रेसमध्ये होते. सध्या त्यांचे तिसर्या पिढीतील पुतणे संदीप जाखड काँग्रेसचे आमदार आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर बहुतांश आमदार त्यांच्या बाजूने असल्याचा आरोप सुनील जाखड यांनी केला होता. असे असतानाही त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले नाही. त्यामागचे कारण म्हणजे सोनिया गांधींच्या जवळच्या अंबिका सोनी. यापूर्वी काँग्रेसने जाखड यांना हटवून नवज्योत सिद्धू यांना प्रमुख केले होते. यानंतर नाराज होऊन जाखड हे सक्रिय राजकारणापासून दूर गेले होते.