Forbes : जगातील सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये निर्मला सीतारमण, फोर्ब्सकडून टॉप 100 महिलांची यादी जाहीर
Forbes #PowerWomen : फोर्ब्सने 2020 वर्षातील सर्वात शक्तिशाली महिलांची यादी जाहीर केली आहे. यात देशाच्या अर्थ मंत्री निर्मला सीतारमण, अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्रपती कमला हॅरिस, बायोकॉनच्या संस्थापक किरण मजूमदार शॉ आणि एचसीएल इंटरप्राईजच्या सीईओ रोशनी नडार मल्होत्रा यांचा समावेश आहे.
न्यूयॉर्कः फोर्ब्सने 2020 (Forbes Power Women ) वर्षातील सर्वात शक्तिशाली महिलांची यादी जाहीर केली आहे. यात देशाच्या अर्थ मंत्री निर्मला सीतारमण, अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्रपती कमला हॅरिस, बायोकॉनच्या संस्थापक किरण मजूमदार शॉ आणि एचसीएल इंटरप्राईजच्या सीईओ रोशनी नडार मल्होत्रा यांचा समावेश आहे. या यादीत सलग दहाव्या वर्षी जर्मनीच्या चान्सलर एजेंला मर्केल अव्वल स्थानी आहेत. न्यूझीलॅंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. ज्यांनी कडक नियमावली करत आपल्या देशाला कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपासून वाचवलं.
17 व्या वार्षिक ‘फोर्ब्स पावर लिस्ट’ मध्ये 30 देशांमधील महिलांचा समावेश आहे. फोर्ब्सनं म्हटलं आहे की, यामध्ये दहा देशांच्या प्रमुख, 38 सीईओ आणि पाच मनोरंजन क्षेत्रातील महिलांचा समावेश आहे. भलेही त्या वयाने, राष्ट्रीयतेने आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील असतील मात्र 2020 सालात आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांनी प्रभावीपणे काम केलं आहे.
41 व्या स्थानी आहेत निर्मला सीतारमण
निर्मला सीतारमण या यादीत 41 व्या स्थानी आहेत. नडार मल्होत्रा 55 व्या तर किरण मजूमदार शॉ 68 व्या स्थानी आहेत. लॅंडमार्क समूहाच्या प्रमुख रेणुका जगतियानी या यादीत 98व्या स्थानी आहेत. अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्रपती कमला हॅरिस तिसऱ्या स्थानी आहेत. तर जर्मनीच्या चांसलर एंजेला मर्केल सलग दहाव्या वर्षी पहिल्या स्थानावर कायम आहेत.
मर्केल यांनी आर्थिक संकटातून सावरलं
फोर्ब्सनं म्हटलं आहे की, मर्केल यूरोपातील प्रमुख नेत्या आहेत. जर्मनीला आर्थिक संकटातून सावरत त्या क्षेत्रातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचं त्या नेतृत्व करत आहेत.
तैवानच्या राष्ट्रपती साई इंग वेन 37 व्या स्थानी
फोर्ब्सनं सांगितलं की, तैवानच्या राष्ट्रपती साई इंग वेन 37व्या स्थानी आहेत. त्यांनी जानेवारी महिन्यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यासाठी एक कार्यक्रम लागू केला. त्यामुळं आज 2.3 कोटी लोकसंख्येच्या या देशात केवळ 7 मृत्यू कोरोनामुळं झाले आहेत.
शेख हसीना 39व्या स्थानी
या यादीत बिल आणि मिलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या सहअध्यक्षा मिलिंडा गेट्स (पाचवं स्थान), अमेरिकन सदनाच्या स्पीकर नैंसी पेलोसी (सातवं स्थान), फेसबुकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शेरिल सॅंडबर्ग (22व्या स्थानी), बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (39व्या स्थानी), ब्रिटनच्या महारानी एलिजाबेथ द्वितीय (46 व्या स्थानी), सुप्रसिद्ध कलाकार रिहाना (69व्या स्थानी) आणि बेयोंसे (72 व्या स्थानी) यांचा देखील समावेश आहे.