(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Independence Day 2022: देशभरातील सगळ्या वारसा स्थळांवर 15 ऑगस्टपर्यंत प्रवेश विनामूल्य
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने देशभरातील सर्व भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) संरक्षित स्मारकांमध्ये मोफत प्रवेशाची घोषणा केली आहे. 15 ऑगस्टपर्यंत मोफत प्रवेश दिला जाईल.
Independence Day 2022: केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने देशभरातील सर्व भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) संरक्षित स्मारकांमध्ये मोफत प्रवेशाची घोषणा केली आहे. 15 ऑगस्टपर्यंत मोफत प्रवेश दिला जाईल. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या स्मरणार्थ मोदी सरकारच्या 'आझादी का अमृत महोत्सवा'चा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
"प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष नियम, 1959 च्या दुसऱ्या शेड्यूलमधील सर्व तिकीट केलेल्या केंद्रीय संरक्षित स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष तसेच 5 ऑगस्ट, 2022 ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत सर्व पुरातत्व स्थळ संग्रहालयांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असं एएसआयने परिपत्रकात म्हटले आहे. आझादी का अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यदिनी भारतभरातील 150 हेरिटेज स्थळांवर तिरंगा फडकवला जाईल. 150 केंद्र-संरक्षित स्मारके तिरंग्यात प्रकाशित केली जातील, असे अधिकाऱ्याने सांगितले आहे.
स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या उत्सवाचा भाग म्हणून, ASI देशभरातील 150 स्मारकांवर राष्ट्रीय ध्वज फडकवेल. ASI द्वारे संरक्षित भारतातील एकूण 3,693 वारसा स्थळे आहेत. तसंच वृक्षारोपण मोहीम, शालेय संवाद, व्याख्याने आणि शालेय मुलांमध्ये जागरूकता वाढवणे, असे विविध कार्यक्रम आयोजित करतील, असे निवेदनात म्हटले आहे.
पुण्यातील शनिवार वाड्यावर प्रवेश विनामूल्य
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात साजरा केला जात आहे. त्याचंच औचित्य साधून पुण्यातील सगळ्या वारसा स्थळांवर विनामुल्य प्रवेश मिळणार आहे, असं भारतील पुरातत्व सर्वेक्षण विभागातर्फे सांगण्यात आलं आहे. आजपासून (5 ऑगस्ट) 15 ऑगस्टपर्यंत पुढील दहा दिवस तिकीट न काढता प्रवेश मिळणार आहे. यासोबतच लोकसहभाग असलेले अनेक कार्यक्रम आणि योजना राबवण्यात येणार आहे. शनिवार वाडा, पाताळेश्वर लेणी, आगाखान पॅलेस, लोणावळ्यातील कार्ला-भाजा लेणी, लेण्याद्री, लोहगड आणि शिवनेरी या सगळ्या वारसा स्थळांवर विनामुल्य प्रवेश मिळणार आहे.
भारत स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. त्याला 'आझादी का अमृत महोत्सव' असं नाव देण्यात आलं आहे. आझादी का अमृत महोत्सव हा भारत सरकारच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या लोकांचा, संस्कृतीचा आणि प्रगतीशील भारताच्या गौरवशाली इतिहासाचा गौरव करण्यासाठीचा एक उपक्रम आहे.