एक्स्प्लोर
ईव्हीएम हॅकिंगमुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, हॅकरचा दावा
2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन) हॅक करण्याचं तंत्र आपल्याकडून आत्मसात केल्याचं अमेरिकन हॅकर सय्यद शुजाने लंडनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
लंडन : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ईव्हीएम हॅक केल्याचा दावा आंतरराष्ट्रीय हॅकरने केला आहे. विशेष म्हणजे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम हॅकिंगबद्दल सर्व माहिती असल्यामुळे पक्षातील नेत्यांनीच त्यांची हत्या केल्याचा आरोप हॅकरने केला.
लंडनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सय्यद शुजा या हॅकरने अत्यंत खळबळजनक आरोप केले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन) हॅक करण्याचं तंत्र आपल्याकडून आत्मसात केल्याचंही हॅकरने म्हटलं आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत देखील भाजपचा ईव्हीएम हॅक करुन जिंकण्याचा प्रयत्न होता परंतू आपण त्यांच्याकडून होणारे 'फ्रिक्वेन्सी ट्रान्समिशन' थांबवून आपच्या बाजूने निकाल वळवला असा दावा देखील या हॅकरने केला आहे.
2014 मधील लोकसभा निवडणुकांच्या वेळी गोपीनाथ मुंडेंनी आपल्याशी संपर्क साधला होता, असा दावा सय्यद शुजाने केला. गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम हॅक केल्याची माहिती होती. मुंडे ही बाब जगजाहीर करण्याच्या भीतीनेच भाजपमधील काही नेत्यांनी त्यांची हत्या घडवून आणली, असा दावा सय्यद शुजाने यावेळी केला.
गोपीनाथ मुंडे यांचं राजधानी दिल्लीत कार अपघातामध्ये निधन झालं होतं. 3 जून 2014 रोजी दिल्ली विमानतळावर जाताना त्यांच्या गाडीला एका वेगवान कारने धडक दिली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुंडेंना तातडीने 'एम्स'मध्ये दाखल करण्यात आलं, मात्र कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, पत्रकार गौरी लंकेशही हॅकिंगची बातमी देणार होत्या, म्हणूनच त्यांचा जीव घेतल्याचा आरोपही शुजाने केला. गौरी लंकेश यांनी ईव्हीएममध्ये वापरल्या जाणाऱ्या केबलचं उत्पादन कोणी केलं, ही माहिती आरटीआय अंतर्गत मागवल्यानंतर त्यांची हत्या झाली, असा दावा शुजाने केला.
लंडनमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बलही उपस्थित होते. इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन (युरोप)ने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
ट्रान्समीटरच्या सहाय्याने ईव्हीएममध्ये हॅकिंग शक्य असल्याचंही शुजाने सांगितलं. आपली 14 जणांची टीम होती, मात्र त्यापैकी काही जणांची हत्या झाल्याचा दावाही हॅकरने केला. भाजप-आपसोबतच सपा-बसपनेही ईव्हीएम हॅकिंगसाठी संपर्क साधल्याचा दावा हॅकरने केला. यापूर्वी आपल्यावर हल्ल्याचे प्रयत्न झाल्यामुळे आपण अमेरिकेत शरणागती पत्करल्याचं हॅकर सय्यद शुजाने सांगितलं.
दरम्यान, ईव्हीएम हॅक झाल्याचा दावा चुकीचा असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित असून त्यांच्याशी छेडछाड केली जाऊ शकत नाही, असं निवडणूक आयोगाने परिपत्रक काढून स्पष्ट केलं आहे.
ईव्हीएम हॅकिंगबाबत काँग्रेस अपप्रचार असल्याचा पलटवार भाजपने केला आहे. गोपीनाथ मुंडे मृत्यू प्रकरणाच्या चौकशीची मागणी सर्वपक्षीयांनी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली असून ईव्हीएमवर बंदी आणण्याची वेळ आल्याचंही राष्ट्रवादीतर्फे सांगण्यात आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
भारत
क्रिकेट
Advertisement