(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चंदा कोचर यांच्याविरोधात ईडीची मोठी कारवाई, मुंबईतल्या घरासह 78 कोटींची संपत्ती जप्त
आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंदा कोचर यांच्याविरोधात ईडीने (सक्तवसुली संचालनालय) मोठी कारवाई केली आहे. ईडीने कोचर यांची एकूण 78 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.
मुंबई : व्हिडीओकॉन कर्जप्रकरणात दोषी ठरलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंदा कोचर यांच्याविरोधात ईडीने (सक्तवसुली संचालनालय) मोठी कारवाई केली आहे. ईडीने कोचर यांची एकूण 78 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. त्यामध्ये त्यांचे मुंबईतली घर आणि त्यांच्या पतीच्या कंपनीच्या काही संपत्तीचा समावेश आहे.
चंदा कोचर या आयसीआयसीआय बँकेत सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक असताना आयसीआयसीआय बँकेने वेणुगोपाल धूत यांच्या व्हिडीओकॉन समूहाला 3,250 कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. त्याबदल्यात धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या कंपनीत 64 कोटी रुपये गुंतवल्याचा आरोप आहे.
चंदा कोचर यांच्यावरील आरोप धूत यांच्या व्हिडीओकॉन ग्रुपला 20 बँकांच्या ग्रुपनं कर्ज दिलं होतं. ज्यात आयसीआयसीआय बँकेचा वाटा 10 टक्के होता. मात्र धूत यांनी आयसीआयसीआयकडून मिळणाऱ्या कर्जाच्या बदल्यात चंदा कोचर यांचे पती दीपक यांच्यासोबत मिळून न्यू पॉवर रिन्यूएबल नावानं कंपनी उघडली. ज्यात दीपक यांची 50 टक्क्यांची भागीदारी होती. हा सरळ सरळ भ्रष्टाचार असल्याचा आरोप करत शेअरहोल्डर अरविंद गुप्तांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून तक्रार केली होती.
वेणुगोपाल धूत आणि आयसीआसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि त्यांच्या दोन नातेवाईकांनी मिळून डिसेंबर 2008 मध्ये एक कंपनी स्थापन केली. या कंपनीला 'घरच्याच' आयसीआसीआय बँकेने तब्बल 64 कोटी रुपयांचं कर्ज दिलं. मात्र अवघ्या काही दिवसात या कंपनीची मालकी अवघ्या 9 लाख रुपयात दीपक कोचर यांना मिळाली होती. हा कोचर यांचा हा काळाबाजार आता उघड झाला आहे.
चंदा कोचर यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बँकेने कोचर यांचा राजीनामा मंजूर करत कोचर यांना ICICI बँकेच्या सर्व जबाबदारीतून मुक्त केलं आहे. संदीप बक्शी यांच्यावर ICICI बँकेच्या एमडी आणि सीईओ पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पुढील पाच वर्षांसाठी बक्शी यांना पदासाठी नियुक्त करण्यात आलं आहे.